महामार्गावरील खड्डे, धुळीने तीसगावकर हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:37 IST2020-12-12T04:37:31+5:302020-12-12T04:37:31+5:30
तीसगाव : पाथर्डी तालुक्यातील तीसगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे व धुळीने त्रस्त झालेल्या संतप्त व्यापारी वर्गाने येथील भाऊसाहेब ...

महामार्गावरील खड्डे, धुळीने तीसगावकर हैराण
तीसगाव : पाथर्डी तालुक्यातील तीसगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे व धुळीने त्रस्त झालेल्या संतप्त व्यापारी वर्गाने येथील भाऊसाहेब लवांडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग विभाग, पोलीस ठाण्याला देण्यात आले.
तीसगाव येथील बसस्थानक ते बाजारतळ या अंतरातील रस्त्यावर पडलेले खड्डे आणि ते बुजवण्यासाठी वापरण्यात आलेल्या मातीमिश्रित मुरुमामुळे धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या भागातील व्यापाऱ्यांना श्वसनाचे विकार सुरू झाले आहेत. एका वर्षापूर्वी एका व्यापऱ्याचे या धुळीच्या त्रासाने निधन झाले होते. यावर्षी पावसाळ्यात जे खड्डे पडले होते. ते खड्डे बुजविताना वापरण्यात आलेल्या मुरुमामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. व्यावसायिकांनी व्यवसाय बंद करावा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांबरोबरच या भागात राहणाऱ्या ग्रामस्थांनादेखील त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त व्यापारी वर्ग आणि ग्रामस्थांनी भाऊसाहेब लवांडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार श्याम वाडकर यांची भेट घेऊन आंदोलनाचे निवेदन दिले.
यावेळी बाबा पुढारी, चांद तांबोळी, वसीम सय्यद, अखिल लवांडे, कादीर पठाण, आतिक शेख, राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष अंबादास शिंदे, नौशाद दफेफार, सचिन साळवे, आमीनभाई बारामतीवाले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तातडीने या भागातील रस्त्यावर डांबरी लेअर टाकण्याची मागणी केली गेली. तहसीलदार वाडकर यांनी या प्रश्नी आपण लक्ष घालून प्रश्न मार्गी लावू. आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, अशी ग्वाही दिली. रस्त्याचा प्रश्न लवकर न सुटल्यास १४ डिसेंबर रोजी तीसगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.