पिंपळगाव माळवी तलावाला परदेशी पाहुण्यांची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:30 IST2021-02-05T06:30:09+5:302021-02-05T06:30:09+5:30

पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील ऐतिहासिक पिंपळगाव तलाव तब्बल दहा वर्षांनी ओसंडून वाहात आहे. नगर ...

Pimpalgaon Malvi Lake is the hope of foreign visitors | पिंपळगाव माळवी तलावाला परदेशी पाहुण्यांची आस

पिंपळगाव माळवी तलावाला परदेशी पाहुण्यांची आस

पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील ऐतिहासिक पिंपळगाव तलाव तब्बल दहा वर्षांनी ओसंडून वाहात आहे. नगर शहराजवळील हे तलाव स्थलांतरित पक्ष्यांचे आवडते ठिकाण आहे. मात्र, यंदा परदेशी पाहुणे अद्यापपर्यंत या तलावाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे स्थानिक पक्षीही इतर जलाशयांकडे स्थलांतर करीत आहेत.

हिमालयाच्या कुशीतून, कच्छच्या वाळवंटातून आणि युरोपीय देशातून येत असलेले विविध जातींचे अन् विविध रंगांचे पक्षी पाहण्याची पर्वणी पक्षीप्रेमींना थंडीच्या दिवसात पिंपळगाव माळवी तलाव येथे मिळते. ऑक्टोबर ते जानेवारी हा अनेक पक्ष्यांचा प्रजनन काळ असतो. युरोप, हिमालयातील बोचरी थंडी नवजात पिल्लांना सहन होत नाही. त्यामुळे तेथील पक्षी तुलनेने कमी तापमान असलेल्या प्रदेशाकडे स्थलांतर करतात. जसजशी तिकडे थंडी वाढते तसतसे परदेशी पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून येथील जलाशयात विसावतात.

नगर परिसरातील कापूरवाडी, पिंपळगाव माळवी व अन्य तलावात दरवर्षी अनेक पक्षी स्थलांतर करून येतात. ब्राह्मणी बदक, तलवार बदक, पाणडुबी, वारकरी, वैष्णव, फ्लेमिंगो, चित्रबलाक, पांढऱ्या मानेचा करकोचा, वेडा राघू, तांबट, खंड्या, मुनिया, पाकोळी, कोतवाल, पाणकोंबड्या आदी पक्ष्यांचा मेळावाच या तलावांच्या किनारी भरत असतो. यावर्षी तलाव पूर्ण क्षमतेने भरूनदेखील जानेवारीचा तिसरा आठवडा उलटला तरी पक्ष्यांचे थवे अद्याप दाखल झालेले नाहीत. तलावातील मासे हे पक्ष्यांचे आवडते खाद्य असते. पण त्यांच्या खाद्यावर माणसेच डल्ला मारत आहेत. नगर-वांबोरी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळेही तलावात पक्षी थांबत नाहीत.

-----

जानेवारी संपला तरीदेखील नगरकरांना परदेशी पक्ष्यांचे दर्शन झाले नाही. फेब्रुवारी - मार्चनंतर पक्ष्यांच्या परतीचा काळ सुरू होईल. त्यामुळे यावर्षी परदेशी पक्षी निरीक्षणाची संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

भैरवनाथ वाकळे,

पक्षीमित्र

फोटो ओळ २५ पिंपळगाव माळवी तलाव

पूर्ण क्षमतेने भरूनदेखील पिंपळगाव तलावाकडे यावर्षी स्थलांतरित, स्थानिक पक्ष्यांनी पाठ फिरवली.

Web Title: Pimpalgaon Malvi Lake is the hope of foreign visitors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.