पिंपळगाव जोगातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 18:54 IST2019-03-06T18:54:09+5:302019-03-06T18:54:51+5:30
जुन्नर व पारनेर तालुक्यातील अवर्षणप्रवण भागाला फायदेशीर ठरलेल्या पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्यातून दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी मंगळवारी सकाळी आवर्तन सोडण्यात आले आहे.

पिंपळगाव जोगातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडले
बोटा : जुन्नर व पारनेर तालुक्यातील अवर्षणप्रवण भागाला फायदेशीर ठरलेल्या पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्यातून दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी मंगळवारी सकाळी आवर्तन सोडण्यात आले आहे.
कुकडी पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत असलेल्या पिंपळगाव जोगा धरणाचा ७१ किलोमीटर लांबीचा कालवा पारनेर तालुक्यातील वडझिरे तलावापर्यंत जातो. पारनेर तालुक्यातील २५ किलोमीटर अंतराच्या या कालव्याचा फायदा शेतीसिंचन व पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनासाठी होतो. कालवा परिसरातील गावांमधील दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे यापूर्वी आॅक्टोबर महिन्याचे शेवटच्या आठवड्यात रब्बी हंगामात आवर्तन सोडण्यात आले होते. मात्र त्या वेळी या आवर्तनाच्या पाण्यावरून संघर्ष उडाला होता. कालवा परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. यामुळे कालवा सल्लागार समितीचे बैठकीत आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. दरम्यान, मंगळवारी सकाळी पिंपळगावजोगा धरणातून कालव्यात २२० क्यूसेक वेगाने आवर्तन सोडल्याचे कार्यकारी अभियंता कानडे उपविभागीय अभियंता मिलिंद बागुल शाखा अभियंता मिलिंद बेल्हेकर यांनी सांगितले. टेल टू हेड पध्दतीने सोडलेल्या या कालव्यातील पाण्याचा ठिकठिकाणी उपसा होऊ नये, यासाठी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. शनिवारी हे पाणी वडझिरे तलावात पोहोचणार असल्याचा अंदाज कुकडी प्रकल्प विभागाने व्यक्त केला आहे.