पिंपळगाव जोगेचे पाणी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:23 IST2021-03-23T04:23:09+5:302021-03-23T04:23:09+5:30
अळकुटी : पिंपळगाव जोगे कालव्याचे पाणी मिळाले नसल्याची तक्रार करत अळकुटी (ता. पारनेर) परिसरातील शेतकऱ्यांनी रास्ता रोकोचा इशारा देताच ...

पिंपळगाव जोगेचे पाणी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात
अळकुटी : पिंपळगाव जोगे कालव्याचे पाणी मिळाले नसल्याची तक्रार करत अळकुटी (ता. पारनेर) परिसरातील शेतकऱ्यांनी रास्ता रोकोचा इशारा देताच कुकडी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी पिंपळगाव जोगेचे पाणी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सोडण्याचे आश्वासन दिले.
पिंपळगाव जोगेचे आवर्तन सुटल्यानंतर अळकुटी, पाबळ, लोणी मावळा, पाडळी आळे या गावांना अति कमी प्रमाणात पाणी देण्यात आले होते. परंतु, पाणी चालू असताना पुणे जिल्ह्यातील जुन्नर (रानमळा बेल्हा) येथे पाणी वळवून घेण्यात आले होते. याबाबत शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा एल्गार दिला होता. त्यानंतर पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले.
जोपर्यंत पूर्ण क्षमतेने पाणी मिळणार नाही तोपर्यंत आंदोलनाचा पवित्रा कायम राहणार आहे, असे अळकुटीचे उपसरपंच शरद घोलप यांनी सांगितले. लवकरात लवकर आवर्तन मिळावे यासाठी पाटबंधारे विभागाला निवेदन देण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच सखाराम उजागरे, उपसरपंच शरद घोलप, ग्रामपंचायत सदस्य अरिफ पटेल, बाजीराव शिरोळे, दामोदर घोलप, सुभाष भोसले, आनंद शिरोळे, अशोक शिरोळे, बंडू घोलप, कैलास शिंदे, जलिंदर घोलप, अतुल घोलप, तुषार घोलप, गौतम घोलप, सागर घोलप, गोरख घोलप आदी उपस्थित होते.
---
२२ अळकुटी
कुकडी पाटबंधारेचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांना निवेदन देताना अळकुटी परिसरातील शेतकरी.