'तो' मदतीची याचना करत होता अन् लोकांची द्राक्षे पळवण्यासाठी झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 13:00 IST2019-02-02T11:50:16+5:302019-02-02T13:00:11+5:30

शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोळगावहून नाशिकच्या दिशेने सुमारे दहा टन द्राक्षे घेऊन जात असलेला ट्रक महामार्गावर पलटी झाला.

people stole the grapes Instead of helping the driver after the accident in ahmednagar | 'तो' मदतीची याचना करत होता अन् लोकांची द्राक्षे पळवण्यासाठी झुंबड

'तो' मदतीची याचना करत होता अन् लोकांची द्राक्षे पळवण्यासाठी झुंबड

ठळक मुद्देशुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोळगावहून नाशिकच्या दिशेने सुमारे दहा टन द्राक्षे घेऊन जात असलेला ट्रक महामार्गावर पलटी झाला. अपघातानंतर चालकाला मदत करण्याऐवजी लोकांची द्राक्षे पळवण्यासाठी एकच झुंबड उडाली. कार थांबवून लोकांनी द्राक्षांचे कॅरेटचे कॅरेट भरून नेले. यामुळे या परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

सोमेश शिंदे

अहमदनगर - अपघात झाला की अपघातग्रस्तांना मदत करायचे सोडून त्यांच्या वस्तू पळवणे, चोरी करणे यासारख्या घटनांमुळे माणुसकी आता नावापुरतीच उरली आहे. नगर-दौंड महामार्गावरील अपघातावेळी याचा प्रत्यय आला. चालक, मदतीची याचना करत असतानाही रस्त्यावरील हावराटांनी द्राक्षांचा ट्रक लुटल्याची घटना समोर आली आहे. 

शुक्रवारी (१ फेब्रुवारी) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोळगावहून नाशिकच्या दिशेने सुमारे दहा टन द्राक्षे घेऊन जात असलेला ट्रक (क्रमांक यु.पी ७२, टी ७१३५ ) महामार्गावर पलटी झाला. अपघातानंतर चालकाला मदत करण्याऐवजी लोकांची द्राक्षे पळवण्यासाठी एकच झुंबड उडाली. माणुसकीचा कुठलाही लवलेश न ठेवता पलटलेल्या ट्रकवर जनतेने अक्षरश: उडी घेतली. हातात मावेल तेवढी द्राक्षे लोकांनी पळवली. लोकांचा जमाव पाहता ट्रक चालकाने हाता पाया-पडत जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या विनवणीचा लोकांवर कुठलाच परिणाम होत नव्हता.

विशेष म्हणजे काही लोकांनी पोत्यांमध्ये भरून तर काहींनी स्वत:च्या अंगातील शर्ट काढून त्यात द्राक्षे भरून नेली. काही लोक गाड्या द्राक्षे पळवण्यासाठी थांबत होते. रस्त्यावरून जाताना कार थांबवून लोकांनी द्राक्षांचे कॅरेटचे कॅरेट भरून नेले. यामुळे या परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. ट्रकच्या रांगा त्यात द्राक्षे लुटण्यासाठी झालेली झुंबड यामुळे वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला होता. नागरिकांनी माणुसकी शून्य भावनेचे दाखविलेले दर्शन लक्षात घेता माणसातील विकृती किती वाढली आहे याचाच हा प्रत्यय म्हणावा लागेल.

द्राक्षांचा सीझन नुकताच सुरू झाला आहे. पाऊस कमी पडल्याने द्राक्षांचे भाव ७० ते ८० रुपये प्रतिकिलो असून चांगल्या प्रतिचे द्राक्षे १०० रुपये किलोने विकले जात आहेत. मात्र नगर दौंड महामार्गावरून प्रवास करणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील चिखली परिसरातील लोकांना फुकट द्राक्षे खाण्याची आयतीच संधी मिळाली.

Web Title: people stole the grapes Instead of helping the driver after the accident in ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.