पुरवठा पथकाच्या हातावर तुरी देऊन ‘तो’ चालक पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:21 IST2021-02-13T04:21:08+5:302021-02-13T04:21:08+5:30
शेवगाव : तालुक्यातील अमरापूर गावाच्या शिवारात धान्याने भरलेला टेम्पो ग्रामस्थांच्या सतर्कतेने पथकाने सोमवारी ( दि.८) पकडला होता. सदर आयशर ...

पुरवठा पथकाच्या हातावर तुरी देऊन ‘तो’ चालक पसार
शेवगाव : तालुक्यातील अमरापूर गावाच्या शिवारात धान्याने भरलेला टेम्पो ग्रामस्थांच्या सतर्कतेने पथकाने सोमवारी ( दि.८) पकडला होता. सदर आयशर टेम्पोचा चालक शेवगाव पोलीस ठाण्यातून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. लॉकडाऊन काळात केंद्र सरकारने नागरिकांसाठी पुरवलेल्या मोफत धान्य वाटपात मोठा गैरव्यवहार करून ते धान्य काळ्या बाजार विक्री केले गेले असा संशय नागरिकांतून व्यक्त होत आहे. सदर चालकाला पोलीस ठाण्यातून पळवून लावणारे कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अमरापूर हद्दीत ६० गोण्या तांदूळ, तर १०० गोण्या गहू असे सुमारे ८० क्विंटल धान्याने भरलेला आयशर कंपनीचा टेम्पो (क्रमांक एमएच १६ एई ३३४५) हा संशयास्पदरीत्या उभा असल्याने नागरिकांना संशय आल्याने त्यांनी त्या टेम्पोच्या चालकाकडे धान्य व परवानासंबंधाची चौकशी केली असता मला इथे थांबण्यासाठी सांगण्यात आले आहे, फोन करून कुठे गाडी खाली करायची हे सांगणार आहेत, अशी उत्तरे मिळाल्याने सतर्क नागरिकांनी तहसीलदार अर्चना पागिरे यांना संपर्क साधून प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी नायब तहसीलदार व्ही.के. जोशी, प्रभारी पुरवठा निरीक्षक एस.एम. चिंतामणी यांच्यासह घटनास्थळी दाखल होऊन धान्याचा पंचनामा केला. त्यानंतर टेम्पो व चालकाला पुढील चौकशीकरिता शेवगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.
दरम्यान, पुरवठा विभागाचे चिंतामणी यांनी चालकाचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्यासाठी थांबले असता अधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर थांबलेला चालक प्रल्हाद दिनकर पवार ( रा. नवगण, राजुरी, जि. बीड) हा तेथून पसार झाला आहे.
दरम्यान, प्रभारी पुरवठा निरीक्षक चिंतामणी यांनी त्या चालकाने स्वामी समर्थ मंगल कार्यालयाच्या पाठीमागे केसभट वस्तीतील येथील खासगी पटांगणातून धान्य भरले होते व कुठे खाली करायचे हे अमरापूर येथे सांगण्यात येईल, अशी सूचना दिल्याचा जबाबात म्हटले असल्याचे सांगितले.
सदरील घटना फिर्याद देत असताना घडली यावेळी चालक पोलिसांच्या की पुरवठा पथकाच्या ताब्यात होता. चालक फरार झाला कसा, असा सवाल नागिरकांतून विचारला जात आहे.
.....
‘तो’ चालक फिर्याद देण्यापूर्वी पसार झाला होता, ही बाब फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीत नमूद केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार असलेल्या त्या चालकाचा पोलीस कसून शोध आहेत. या प्रकरणाच्या तळाशी जाऊन चौकशी केली जाईल व संबंधितांना अटक करू.
-प्रभाकर पाटील. पोलीस निरीक्षक, शेवगाव
....
आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो असता गोरे साहेबांनी त्या चालकाला बाहेर थांबण्यास सांगितले होते. त्यावेळी एका कर्मचाऱ्याला लक्ष देण्यास सांगण्यात आले. दरम्यान तो कर्मचारी फोनवर बोलत असताना संशयित चालक पळून गेला. त्याचा मोबाइल पोलिसांच्या ताब्यात आहे.
-एस.एम. चिंतामणी, प्रभारी पुरवठा निरीक्षक