बारा तास नंबर लावून मिळवावा लागतो ऑक्सिजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:22 IST2021-04-23T04:22:32+5:302021-04-23T04:22:32+5:30
पारनेर : तालुक्यात ३०० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यांना ऑक्सिजन आणण्यासाठी डॉक्टर लोकांना नगर, पुणे, नाशिकपर्यंत धावाधाव करावी लागत आहे. ...

बारा तास नंबर लावून मिळवावा लागतो ऑक्सिजन
पारनेर : तालुक्यात ३०० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यांना ऑक्सिजन आणण्यासाठी डॉक्टर लोकांना नगर, पुणे, नाशिकपर्यंत धावाधाव करावी लागत आहे. बारा-बारा तास नंबर लावूनही ऑक्सिजन लवकर उपलब्ध होत नाही, अशी परिस्थिती पारनेर तालुक्यात असल्याचे चित्र वेगवेगळ्या डॉक्टरांबरोबर बोलल्यावर समोर आले.
पारनेर येथे चार, सुपा दोन, भाळवणी दोन, टाकळी ढोकेश्वर एक असे कोविड सेंटर आहेत. या ठिकाणी साधारण ३०० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. पारनेर ग्रामीण रुग्णालय व एक शासकीय सेंटर असे मिळून ५७ रुग्ण, विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये ७ असे ऑक्सिजनवर रुग्ण आहेत. येथे ऑक्सिजन अपुरा पडत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, डॉ. बाळासाहेब कावरे, डॉ. श्रीकांत पठारे यांनी सांगितले.
आम्हाला ऐनवेळी पुणे जिल्ह्यातून आमदार नीलेश लंके यांच्यामुळे ऑक्सिजनची व्यवस्था होते, असे डॉ. कावरे यांनी सांगितले. बारा-बारा तास ऑक्सिजनसाठी नंबर लावावा लागतो, असे डॉ संदीप औटी सांगत होते. सुपा येथे पुणे, नगर, नाशिकहून ऑक्सिजन आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, असे डॉ. बाळासाहेब पठारे यांनी सांगितले.
भाळवणी आणि टाकळी ढोकेश्वरच्या कोविड सेंटरलाही ऑक्सिजन रुग्णांची संख्या मोठी आहे आणि ऑक्सिजन कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने खूप धावपळ होते, असे डॉ. किरण रोहोकले, डॉ. आव्हाड, डॉ. भाऊसाहेब खिलारी, डॉ. किरण आहेर यांनी सांगितले.
तालुक्यात नगर, शिरूर, श्रीगोंदा, संगमनेर येथून रुग्ण येत असल्याने संख्या जास्त असल्याचे एका डॉक्टरांनी सांगितले. भाळवणी येथील आमदार नीलेश लंके यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये सध्या ऑक्सिजनवर असणारे ४० रुग्ण आहेत. तेथेही ऑक्सिजनची टंचाई आहे. मात्र आमदार लंके हे नगर, पुणे एमआयडीसी येथून काही प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध करून देत असल्याने ऑक्सिजन मिळतोय, असे वनकुटेचे सरपंच राहुल झावरे, दादा शिंदे, विजय औटी, अभयसिंह नांगरे यांनी सांगितले.