सामाजिक बांधीलकीतून सोनू सूदने विद्यार्थ्यांना केले १०० मोबाइलचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 16:06 IST2021-01-09T16:05:37+5:302021-01-09T16:06:55+5:30
कोपरगाव शहरातील नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील १०० गरजवंत विद्यार्थ्यांना अभिनेता सोनू सूद यांनी शुक्रवारी (दि.८) कोपरगावात येऊन एम. के. आढाव विद्यालयात प्रत्येक विद्यार्थ्याला एक ॲण्ड्रॉइड मोबाइल असे एकूण १० लाख रुपये किमतीचे १०० मोबाईलचे वाटप केले.

सामाजिक बांधीलकीतून सोनू सूदने विद्यार्थ्यांना केले १०० मोबाइलचे वाटप
कोपरगाव : कोपरगाव शहरातील नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील १०० गरजवंत विद्यार्थ्यांना अभिनेता सोनू सूद यांनी शुक्रवारी (दि.८) कोपरगावात येऊन एम. के. आढाव विद्यालयात प्रत्येक विद्यार्थ्याला एक ॲण्ड्रॉइड मोबाइल असे एकूण १० लाख रुपये किमतीचे १०० मोबाईलचे वाटप केले.
यावेळी पत्नी सोनाली सूद, मुलगा इशांत सूद, नीती गोयल, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, पोलीस निरीक्षक दौलत जाधव उपस्थित होते. कोपरगाव नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती विनोद राक्षे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम पार पडला आहे.
कोरोनामुळे कोपरगाव शहरातील अनेक विद्यार्थी पालकांच्या आर्थिक परिस्थितीअभावी मोबाइल नसल्याने ऑनलाइन शिक्षणापासून वंचित होते. यातून त्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होत होते. त्यासाठी विनोद राक्षे यांनी अशा विद्यार्थ्यांचा स्वतः घरोघरी जाऊन सर्व्हे केला. यामध्ये सुमारे १०० विद्यार्थी- विद्यार्थिनी यांच्याकडे केवळ मोबाईल नाहीत. त्यावर राक्षे यांनी ही समस्या थेट त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असलॆल्या अभिनेते सोनू सूद यांच्या निदर्शनास आणून दिली. सूद यांनी तत्काळ या १०० मुलांना मोबाइल देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. त्यावर सूद यांनी शुक्रवारी थेट कोपरगाव गाठत १०० मुलांना स्वतः मोबाइल भेट दिली.