स्त्री अत्याचाराचं मूळ पुरुषी व्यवस्थेत
By Admin | Updated: July 21, 2014 00:27 IST2014-07-20T23:19:42+5:302014-07-21T00:27:45+5:30
अहमदनगर : जाती अत्याचाराच्या केंद्रस्थानी स्त्री आहे़ स्त्री-पुरुषातील उच-निचता हाही अंधश्रद्धेचा भाग आहे़ ही अंधश्रद्धा झुगारुन स्त्री सक्षम होत आहे़
स्त्री अत्याचाराचं मूळ पुरुषी व्यवस्थेत
अहमदनगर : जाती अत्याचाराच्या केंद्रस्थानी स्त्री आहे़ स्त्री-पुरुषातील उच-निचता हाही अंधश्रद्धेचा भाग आहे़ ही अंधश्रद्धा झुगारुन स्त्री सक्षम होत आहे़ मात्र, पुरुषप्रधान व्यवस्था बदलायला तयार नाही़ स्त्रियांना बाहेर फिरताना पुरुषांची सर्वाधिक भीती वाटते़ पुरुषी व्यवस्थेनेच स्त्रियांना अबला करुन ठेवले आहे़ बाईला माणूस म्हणून जगू दिले जात नाही़ पुरुषी व्यवस्थेची बंधनं झुगारुन बाया आता माणसं व्हायला लागल्या आहेत़ पुरुष कधी माणूस होणार? असा सवाल करीत अत्याचाराचं मूळ पुरुषी व्यवस्थेत असल्याचे ज्येष्ठ कार्यकर्त्या विद्याताई बाळ यांनी सांगितले़
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या (अंनिस) वतीने नगर येथे आॅनर किलींग व जातीय अत्याचार विरोधी राज्यस्तरीय परिषदेच्या अध्यक्षस्थानावरुन बाळ बोलत होत्या़ परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांच्या हस्ते प्रतिकात्मक चातुर्वर्णाची उतरंड फोडून करण्यात आले़ प्रमुख पाहुणे म्हणून अॅड़ प्रेमानंद रुपवते उपस्थित होते़
बाळ म्हणाल्या, ५०० वर्षापूर्वी पुरुषांनी जाणिवपूर्वक स्त्रियांवर दुय्यमता लादली़ मासिकधर्माचे अवडंबर करुन महिलांना सापत्न वागणूक सुरु केली़ पुरुषी अहंभावातूनच महिलांवर बलात्कार होत आहेत़ महिलेवर बलात्कार झाल्यास तीला भ्रष्ट म्हटले जाते मग त्यावेळी बलात्कार करणारा पुरुष भ्रष्ट होत नाही का? हा विचार महिलांमध्ये प्रबळ व्हायला पाहिजे़ आॅनर किलींग हा माणूसपणालाच काळीमा फासणारा प्रकार आहे़ अत्याचार करणारे, न्याय करणारे, वकिली करणारेही पुरुषच असल्याने स्त्रियांना न्याय मिळू शकत नाही़ जोपर्यंत पुरुषांमधील अहंभाव जात नाही, तोपर्यंत महिलांवर अन्याय होतच राहतील, असे बाळ यांनी सांगितले़
प्रारंभी रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे उपाध्यक्ष अरुण कडू यांनी उपस्थितांचे स्वागत केले़ जिल्हा कार्याध्यक्षा अॅड़ रंजना गवांदे यांनी प्रास्तविक केले़ अंनिसचे संगमनेर कार्याध्यक्ष काशीनाथ गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले़ नगर शाखा कार्याध्यक्ष संजय जोशी यांनी आभार मानले़
दुपारी झालेल्या परिसंवादात अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, कार्यकर्त्या डॉ़ मनिषा गुप्ते, भारतीय जनवादी संघटनेच्या राज्य सचिव कॉ़ किरण मोघे, अखिल भारतीय राष्ट्र सेवा दलाचे राज्य कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक, कृष्णा चांदगुडे आदी उपस्थित होते़ सायंकाळी या परिषदेचा समारोप झाला़ समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ़ बाबा आढाव होते़ यावेळी कॉ़ बाबा आरगडे, अरुण कडू, अॅड़ रंजना गवांदे, अविनाश पाटील मंचावर उपस्थित होते़ (प्रतिनिधी)