कोअर बँकिंगसाठी खुली निविदा काढा
By Admin | Updated: July 20, 2014 00:21 IST2014-07-19T23:12:48+5:302014-07-20T00:21:35+5:30
अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत अवघ्या ३० लाख रुपयांत होणाऱ्या कोअर बँकिंग प्रणालीसाठी पावणे दोन कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे.

कोअर बँकिंगसाठी खुली निविदा काढा
अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत अवघ्या ३० लाख रुपयांत होणाऱ्या कोअर बँकिंग प्रणालीसाठी पावणे दोन कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे. यासह २८ लाख रुपयांच्या प्रवास भत्त्यात अनियमितता झालेली असून कोअर बँकिंगसाठी खुली निविदा काढा असे आवाहन सत्ताधारी सदिच्छा मधील रावसाहेब रोहकले गटाने केली आहे.
शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत रोहकले बोलत होते. यावेळी आबासाहेब जगताप, संजय शेळके, बापूसाहेब तांबे आदी उपस्थित होते. रोहकले म्हणाले, सत्ताधारी संचालक मंडळाने ठेवीत यावर्षी ५५ लाख रुपयांची उच्चांकी वाढ झाल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, अशा परिस्थितीत बँकेला कर्ज पुरवठा बंद करण्याची वेळ का यावी असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
कोअर बँकिंग प्रणालीत सुमारे एक कोटींची अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करत सत्ताधाऱ्यांनी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच हा विषय कोणत्याही परिस्थितीत सभेत नामंजूर करण्यात येणार असल्याचे रोहकले म्हणाले. २८ लाख रुपयांच्या प्रवास भत्त्याची रक्कम संचालक मंडळाने स्वत:च्या हितासाठी वापरली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. स्वत:चे खिसे भरण्यासाठी संचालक मंडळाने अधिकाधिक लोन कमिटीच्या बैठका घेतल्याचे जगताप म्हणाले.
ठेवीच्या तुलनेत सभासदांना नेहमीच कमी व्याज मिळत असून यंदा तर शिक्षकांना केवळ अडीच टक्के लाभांश मिळणार आहे. यामुळे रविवारच्या सर्वसाधारण सभेत सदिच्छा मंडळ शांतता मार्गाने सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारून चुकीच्या विषयांना स्थगिती मिळविणार असल्याचे तांबे यांनी सांगितले.
सदिच्छा मंडळाचा कारभार चुकीचा
सदिच्छा मंडळाची मूळ नोंदणी आमच्या ताब्यात आहे. यामुळे आमचे मंडळ अधिकृत असल्याचा दावा यावेळी रोहकले गटाने केलेला आहे. काटकसरीने काम करणाऱ्या संचालक मंडळाचा कर्मचाऱ्यांवरील खर्च वर्षभरात दुप्पट झालेला असल्याचे शेळके यांनी सांगितले.
सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभागृहात गुरूकुल मंडळाची पार्टी मिटींग होणार असल्याची माहिती संजय कळमकर यांनी दिली. रविवारी सकाळी राष्ट्रीय पाठशाळेत सदिच्छा मंडळाची सभा होणार असल्याची माहिती रावसाहेब रोहकले यांनी दिली.
‘सदिच्छा’चा चुकीचा कारभार
सदिच्छा मंडळाकडे प्राथमिक शिक्षक बँकेची सत्ता आल्यापासून चुकीच्या कारभारामुळे वीस कोटींच्या ठेवी घटल्याचा आरोप ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष विजय काकडे यांनी केला आहे.
सभासदांना तीन टक्के लाभांश देणे, कोअर बँकींगवरील खर्चावर संचालकांचे नियंत्रण नाही़ सदिच्छा मंडळाने बँकेच्या बैठका, चहापान, देणगी, इतर वर्गण्या, संचालक प्रवासभत्ता व इतर गोष्टींवरच सुमारे ५ कोटी ४० लाख रुपयांची उधळण केल्याचे काकडे यांनी म्हटले आहे.
रविवारच्या सभेत याविषयी ऐक्य मंडळ जाब विचारणार असल्याचे तालुकाध्यक्ष दादाभाऊ कोल्हे यांनी सांगितले.