एका वर्षात डिझेल ३० टक्के, तर किराणा ४० टक्क्यांनी महागला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:19 IST2021-05-17T04:19:47+5:302021-05-17T04:19:47+5:30
अहमदनगर : गेल्या काही वर्षांत डिझेलचे दर झपाट्याने वाढल्याने त्याचा एकूणच किराणा मालावर परिणाम झाला आहे. एकीकडे रोजगार कमी ...

एका वर्षात डिझेल ३० टक्के, तर किराणा ४० टक्क्यांनी महागला!
अहमदनगर : गेल्या काही वर्षांत डिझेलचे दर झपाट्याने वाढल्याने त्याचा एकूणच किराणा मालावर परिणाम झाला आहे. एकीकडे रोजगार कमी झाले असतानाच सर्वसामान्यांना किराणा खर्चही वाढला आहे. डिझेल दरवाढ, लॉकडाऊनमुळे मालाची आवक बंद झाली असून या काळात मागणीही वाढल्याने किराणा मालाचे दर वाढले आहेत.
गतवर्षीपेक्षा यावर्षी किराणा मालाच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. डिझेल दरवाढही ३० टक्के वाढल्याने वाहतूक खर्चात वाढ झाली असून त्याचा परिणाम मालाच्या दरवाढीत झाला आहे. दिवाळीच्या आधी असलेले दर दिवाळीत मागणी वाढत असल्याने १० ते १५ टक्के वाढले होते. दिवाळीनंतर काही दिवस स्थिर असलेले दर पुन्हा वाढले आहेत. सर्व साधारणपणे किराणा मालात किलोमागे १० ते १५ रुपयांनी वाढ झाली आहे. सर्व प्रकारची गोडेतेल महाग झाले आहेत. ३० ते ३५ रुपयांनी किलोमागे तेल महागले आहे.
१) किराणा दर (प्रती किलो)
वस्तू वर्ष २०२० वर्ष २०२१
तूर डाळ ८५ ते ९० १२५
हरभरा डाळ ७५ ७८
तांदूळ ३६ ३८
साखर ३८ ३६
गूळ ४५ ५०
बेसन ८० ९०
----
तेलही दुप्पट महाग (दर प्रती लीटर)
तेल वर्ष २०२० वर्ष २०२१
शेंगदाणा १२० १८५
सूर्यफूल ११० १९०
करडी १२० २००
सोयाबीन ८८ १६०
पामतेल ७५ १४०
------
१) डिझेल दराचा ग्राफ (भाव प्रती लीटर)
वर्ष २०२० -७७ रुपये
वर्ष २०२१-९० रुपये
‐------
व्यापारी काय म्हणतात...
सध्या मालाची आवक कमी आहे. त्यानंतर जिल्हाबंदी सुरू आहे. उत्पादनही कमी झाले आहे. दुसऱ्या देशातून तेल आयात होत नाही. दुसरीकडे मागणी वाढली आहे. या सर्व कारणामुळे तेलाच्या किमती जवळपास दुप्पट वाढलेल्या आहेत.
- अर्जुन डोळसे, तेलाचे व्यापारी
-------
डाळी नवीन आल्यामुळे त्यामध्ये पाच ते दहा रुपयांची दरवर्षीप्रमाणे वाढ झाली आहे. मोहरी, राजमा, का-हळ, पोहे अशा वस्तूंमध्ये ही १० ते १५ रुपयांची वाढ झालेली आहे. तसेच लाॅडाऊनमुळे व मालाची आवक कमी असल्याने किराणा मालाच्या किमती वाढत आहेत.
- संजय साखरे, किराणा व्यापारी
----
गृहिणी काय म्हणतात?
सध्या काम-धंदे बंद आहेत. दुसरीकडे महागाई वाढली आहे. सामान्य माणसाला जगणे कठीण झाले आहे. महागाईमुळे घरातले बजेट कोलमडले आहे.
- स्मिता किंबहुने, नगर
------
एकीकडे व्यवसाय बंद आहेत. रोजगार बंद पडलेले आहेत. दुसरीकडे महागाई वाढलेली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. किराणा माल घेताना महिन्याचे बजेट दुप्पट झाले आहे.
- अश्विनी झिकरे, नगर