एक जुलैपासून वन महोत्सव
By Admin | Updated: May 23, 2016 23:24 IST2016-05-23T23:15:47+5:302016-05-23T23:24:05+5:30
अहमदनगर : दुष्काळाची तीव्रता कमालीची वाढली आहे़ मानवनिर्मित असलेल्या दुष्काळावर मात करण्यासाठी वृक्षारोपण करण्याची गरज आहे़

एक जुलैपासून वन महोत्सव
अहमदनगर : दुष्काळाची तीव्रता कमालीची वाढली आहे़ मानवनिर्मित असलेल्या दुष्काळावर मात करण्यासाठी वृक्षारोपण करण्याची गरज आहे़ ही गरज लक्षात घेऊन १ जुलै रोजी वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवात समाजातील सर्व घटकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी येथे केले़
आर्ट आॅफ लिव्हींगचे संस्थापक श्रीश्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त ध्यान मंदिरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़ बलभिम डोके, जयश्री कोल्हे, अनिल फुटाणे, सीमा ढाकणे, डॉ़ महेंद्र शिंदे, सुनील बोरा आदी यावेळी उपस्थित होते़ कवडे यांनी दुष्काळाकडे उपस्थितांचे लक्ष वेधले़ ते म्हणाले, सध्या तीव्र दुष्काळ आहे़ पाणी पातळी खालावली असून, विहिरींनी तळ गाठला आहे़ पाण्याचा अमर्याद उपसा सुरू असल्याने ही वेळ आली आहे़ भविष्य काळात पाणी, पर्यावरण व स्वच्छता, या घटकांकडे लक्ष दिले नाही तर जीवसृष्टी धोक्यात येऊ शकते़ म्हणून प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य समजून येत्या १ जुलै रोजी होत असलेल्या वनमहोत्सवात सहभाग नोंदवा़ वनमहोत्सवात एकूण २ कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे, असे कवडे म्हणाले़
राज्य सरकार व वन खात्याने वनमहोत्सवाची तयारी सुरू केली आहे़ जिल्ह्यातील सर्व यंत्रणांकडून तयारी सुरू असून, आतापर्यंत विविध रोपांच्या ५० हजार पिशव्या व ५० हजार बियांचे वाटप करण्यात आले आहे़ हरित सेनेच्या वतीने रोपे तयार करण्यात आली, अशी माहिती उपसंचालक चंद्रकांत तांबे यांनी यावेळी दिली़
(प्रतिनिधी)