स्व.राजीव गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर; दिल्लीच्या भाजप प्रवक्त्याविरुध्द संगमनेरात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 16:33 IST2020-05-27T16:32:05+5:302020-05-27T16:33:26+5:30
देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्याविषयी भाजपचे दिल्लीतील प्रवक्ता तजींदर पालसिंग बग्गा यांनी ट्विट्रवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने त्यांच्याविरोधात मंगळवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

स्व.राजीव गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर; दिल्लीच्या भाजप प्रवक्त्याविरुध्द संगमनेरात गुन्हा
संगमनेर : देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्याविषयी भाजपचे दिल्लीतील प्रवक्ता तजींदर पालसिंग बग्गा यांनी ट्विट्रवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने त्यांच्याविरोधात मंगळवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. युवक कॉँग्रेसचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी बग्गा यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
संगमनेर युवक कॉँग्रेसच्यावतीने प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांना बुधवारी निवेदन देऊन बग्गा यांचा निषेध केला. भाजपचे दिल्लीतील अधिकृत प्रवक्ता तजींदर पाल सिंह बग्गा हे ट्विट्रवर वारंवार आक्षेपार्ह मजूकर टाकून जातीयवाद निर्माण करीत आहेत. देशात कोरोनाचे संकट असताना दोन समाजामध्ये तेढ निर्माण व्हावा, या उद्देशाने मजकूर टाकून ते वाद निर्माण करीत आहेत. त्यांच्या विरोधात याआधी ११ मे ला छत्तीसगडमध्ये गुन्हा दाखल आहे. बग्गा हे वारंवार राजीव गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरत आहेत. जातीयवादी मजकूर पसरून समाजामध्ये तेढ निर्माण करणा-या या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करावा, त्यास कठोर शासन व्हावे. अशी मागणी युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी डॉ. मंगरूळे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोमेश्वर दिवटे, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष निखील पापडेजा, नगरसेवक नितीन अभंग, शेखर सोसे, रोहित बनकर प्रथमेश यावेळी उपस्थित होते.