नगर शहराला आता नवीन प्रवेशद्वारे!

By Admin | Updated: October 17, 2016 01:09 IST2016-10-17T00:43:35+5:302016-10-17T01:09:45+5:30

सुदाम देशमुख , अहमदनगर नगर शहराला पूर्वी बारा वेशी होत्या. त्यातील बहुतांश वेशींची पडझड झाली आहे. दिल्लीगेट आणि माळीवाडा या वेशीबाहेर शहर वाढले आहे.

Now the city is new entrance! | नगर शहराला आता नवीन प्रवेशद्वारे!

नगर शहराला आता नवीन प्रवेशद्वारे!


सुदाम देशमुख , अहमदनगर
नगर शहराला पूर्वी बारा वेशी होत्या. त्यातील बहुतांश वेशींची पडझड झाली आहे. दिल्लीगेट आणि माळीवाडा या वेशीबाहेर शहर वाढले आहे. त्यामुळे ही प्रवेशद्वारे नावालाच आहेत. नगर शहराचे प्रवेशद्वार ही संकल्पनाच इतिहासात जमा झाली आहे. शहराचा प्रवेश नेमका कोठून सुरू होतो, याबाबत संभ्रम आहे. म्हणूनच महामार्गावर चार ठिकाणी भव्य प्रवेशद्वारे उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय महापौर सुरेखा कदम यांनी घेतला आहे.
अहमदनगर शहराला पाचशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. शहराला पूर्वी बारा (गेट) वेशी होत्या. या वेशीबाहेर शहराची वाढ झाली आहे. माळीवाडा आणि दिल्लीगेट या दोन वेशी सोडल्या तर नव्या पिढीला तिसऱ्या वेशीचे नावही सांगता येत नाही. शिवाय या वेशी वाहतुकीसाठी अडथळा ठरल्या आहेत. काही वर्षांपूर्वी दिल्लीगेट स्थलांतराचा प्रस्ताव होता. मात्र त्याला ऐतिहासिक प्रेमींचा विरोध असल्याने ही कल्पना बारगळली. नगरपालिकेची महापालिका होवून तेरा वर्ष झाली आहेत. मात्र शहराची नवी ओळख होईल, असे एकही काम महापालिकेकडून झाले नाही. बाहेरच्या जिल्ह्यातून नगरमध्ये येणाऱ्यांना नगर शहर नेमके कोठून सुरू होते, याबाबत नेमका बोध होत नाही. महापालिकेची हद्द जिथे संपते, त्या ठिकाणी ही प्रवेशद्वारे उभारण्याचा निर्णय महापौर सुरेखा कदम यांनी घेतला आहे. कल्याण-विशाखापट्टणम् रोड, नगर-मनमाड रोड,नगर-पुणे रोड आणि नगर-औरंगाबाद रोड अशा तीन राज्य तर एका राष्ट्रीय महामार्गावर ही प्रवेशद्वारे उभारण्यात येणार आहेत.
याबाबत थेट दिल्ली-मुंबईपासून ते थेट नगरपर्यंत विविध वास्तुतज्ज्ञांशी सध्या महापौर कदम चर्चा करीत आहेत. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वास्तुंचा प्रभाव या प्रवेशद्वारावर राहणार आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम आणि शिवसेना-भाजपाचे पदाधिकारी या ऐतिहासिक कामागिरीमध्ये परिश्रम घेत आहेत.
नगर शहराचे प्रवेशद्वार ही अफलातून तयार करण्यात येणार आहेत. ऐतिहासिक वारसा जपणारी आणि नव्या तंत्रज्ञानाचा आधार असा योग या वास्तुमध्ये साधला जाणार आहे. प्रवेशद्वारावर एक मोठा डिस्प्ले फलक लावण्यात येणार आहे. या फलकावर शहराच्या वैशिष्ट्यांचे दर्शन घडणार आहे. त्याशिवाय जाहिरातीमधूनही महापालिकेला उत्पन्न मिळविण्याचा विचार आहे. आकर्षक आणि महानगराच्या धर्तीवर तयार होणारी प्रवेशद्वारे म्हणजे शहराच्या मार्केटिंगसाठी एक मोठी संधीच मिळणार आहे.

Web Title: Now the city is new entrance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.