- प्रशांत शिंदे अहिल्यानगर - विधानसभेतील शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मागील वर्षी दिला होता. आता विधानपरिषदेतील आमदार अपात्रतेच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे. सभापती प्रा. राम शिंदे यांच्या समोर झालेल्या पहिल्या सुनावणीत उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह शिंदे गटाच्या मुख्य प्रतोद मनिषा कायंदे आणि आमदार विप्लव बाजोरिया यांनी नोटीस बजावण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गटाला वेळ वाढून देण्यात आला आहे.
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे शनिवारी अहिल्यानगर येथे केंद्र सरकारच्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या स्वामित्व योजनेच्या मिळकत प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
सभापती शिंदे म्हणाले, विधानपरिषद सदस्यांनी पक्ष त्याग केल्यानंतर शिवसेना विरुध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी या दोन गटातील अपात्रतेसंदर्भात सुनावणी पार पडल्या. मागील दीड वर्षापासून या दोन्ही गटाचे एकमेकांच्या विरोधातील अपात्रतेचे अर्ज प्रलंबित होते. सभापतीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर प्रलंबित कामाची विधानभवन सचिव यांनी माहिती दिली. यानंतर दोन्ही प्रकरणात सुनावणी पार पडल्या. पहिल्या सुनावणीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून युक्तीवाद करण्यात आला. या दरम्यान दोन्ही गटांनी आणखी वेळ वाढून मागितल्याने त्यांना पुढील तारीख देण्यात आली आहे, अशी माहिती राम शिंदे यांनी दिली.
विधानपरिषेदच्या उपसभापती पिठासीन असल्याने त्या सभागृहाचे काम पाहत होत्या. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून अर्जावर सुनावणी प्रलंबित राहिली होती. या प्रलंबित प्रकरणात नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे आणि विप्लव बाजोरिया या तीन सदस्यांसंदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अपात्रतेबाबत अर्ज केला होता. या तिन्ही सदस्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. सुनावणीसाठी देण्यात आलेल्या तारखेला संबंधित सदस्य आपले म्हणणे मांडतील, अशी माहिती सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली.