हुंडा नको, साखरपुडा-हळद-लग्न एकाच दिवशी करावे; अहिल्यानगरमध्ये मराठा लग्न आचारसंहिता संमेलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 12:28 IST2025-08-04T12:27:54+5:302025-08-04T12:28:15+5:30
रविवारी येथे मराठा लग्न आचारसंहिता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी देवगड संस्थानचे प्रमुख भास्करगिरी महाराज, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार साहेबराव दरेकर आदी उपस्थित हाेते.

हुंडा नको, साखरपुडा-हळद-लग्न एकाच दिवशी करावे; अहिल्यानगरमध्ये मराठा लग्न आचारसंहिता संमेलन
अहिल्यानगर : हुंडा घेणार नाही, देणार नाही, साखरपुडा, हळद व विवाह एकाच दिवशी, अनावश्यक खर्च नाही, डीजेला बंदी, मानपानाला फाटा, प्री वेडिंगचा डामडौल नाही, सासरी सुनेचा छळ होणार नाही, आदी २० कलमी लग्न आचारसंहितेची मराठा समाजातील प्रत्येक घटकातील ११ सदस्यांना शपथ देण्यात आली.
रविवारी येथे मराठा लग्न आचारसंहिता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी देवगड संस्थानचे प्रमुख भास्करगिरी महाराज, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार साहेबराव दरेकर आदी उपस्थित हाेते. जंगले महाराज शास्त्री संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी उद्योजक, समाजसेवक, वकील, डॉक्टर, महिला, शिक्षक, पत्रकार तसेच मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, मराठा उद्योजक लॉबी, छावा संघटना, आदींसह अनेक घटकातील प्रतिनिधींना आचारसंहिता अंमलबजावणीची शपथ देण्यात आली.
अशी आहे आचारसंहिता
लग्न सोहळा ३०० ते ५०० लोकांमध्येच करावा, प्री-वेडिंग बंद करावे, साखरपुडा, हळद व लग्न एकाच दिवशी करण्यात यावे, लग्नात हुंडा घेऊ नये, देऊ नये, डीजे ऐवजी पारंपरिक वाद्य व लोक कलावंतांना संधी द्यावी.
कर्ज काढून लग्न करू नयेत, नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण-तरुणींना पायबंद घालावा, लग्न सोहळ्यात फक्त वधू आणि वर पित्यानेच फेटे बांधावेत.
लग्नात सोन्याची वस्तू, गाड्यांच्या चाव्या देऊन देखावा करू नये, रोख स्वरूपात देण्याऐवजी पुस्तके द्यावीत, अन्नाची नासाडी थांबवावी, भांडी, फर्निचर न देता मुलीच्या नावाने एफडी करावी, सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी प्रयत्न करावेत, लग्नानंतर मुलीच्या संसारात हस्तक्षेप नको, सासरच्या लोकांनी पैशासाठी सुनेचा छळ करू नये