ना कॉल, ना ओटीपी, तरी बँकेतून पैसे गायब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:46+5:302021-06-24T04:15:46+5:30

अहमदनगर: डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हेगार एका जागेवर बसून अगदी सहजरित्या अनेकांची ऑनलाइन फसवणूक करत आहेत. विशेष म्हणजे ...

No call, no OTP, but money disappears from the bank! | ना कॉल, ना ओटीपी, तरी बँकेतून पैसे गायब !

ना कॉल, ना ओटीपी, तरी बँकेतून पैसे गायब !

अहमदनगर: डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हेगार एका जागेवर बसून अगदी सहजरित्या अनेकांची ऑनलाइन फसवणूक करत आहेत. विशेष म्हणजे ना कॉल, ना ओटीपी, तरी बँकेतून पैसे गायब होण्याच्या घटना वाढत आहेत. फ्री गेम, अनोळखी ॲप डाऊनलोड केल्याने असे प्रकार वाढत असल्याचे सायबर पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे.

अशा पद्धतीने बँक खात्यातून पैसे गेल्याच्या संदर्भात वर्षभरात येथील सायबर पोलीस ठाण्यात ५० तक्रारी दाखल आहेत. मोबाइलमध्ये डाऊनलोड केल्या जाणाऱ्या अनेक ॲपमध्ये ‘ऑटो रीड ओटीपी’ परमिशन घेतली जाते. त्यानंतर युझरच्या खात्यातून पैसे गायब होतात. मोबाइलचा वापर वाढला. त्याचबरोबर ऑनलाइन व्यवहारदेखील वाढले आहेत. त्यासाठी विविध प्रकारचे ॲप वापरले जातात. यासह फोटो, व्हिडिओ, साँग एडिटिंग, विविध प्रकारचे ऑनलाइन प्रशिक्षण असे एक ना अनेक प्रकारचे ॲप इंटरनेटवर उपलब्ध आहेत. यातील बहुतांशी ॲप हे सायबर गुन्हेगारांनी निव्वळ फसवणुकीच्या उद्देशाने तयार केलेले असतात. असे ॲप डाऊनलोड करताना त्याचे नियम व अटी न वाचता परमिशन दिली गेली तर खात्यातून पैसे गायब होतात.

------------------------

पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच

सायबर गुन्हेगारांनी ऑनलाइन फसवणुकीचे नवनवीन फंडे शोधून काढले आहेत. जिल्ह्यात मागील चार वर्षांत सात ते आठ पटीने सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. यातील तक्रार जिल्ह्यातील असले तरी आरोपी मात्र जगभरातील आहेत. त्यामुळे अशा गुन्ह्यातील बहुतांशी आरोपींना शोधणे कठीण असते.

यामुळे गेलेले पैसे परत मिळवणे अडचणीचे झाल्याचे सायबर पोलीस सांगतात. फसवणुकीसाठी बनावट कागदपत्रे वापरून काढलेल्या बँक खात्याचा वापर केल्याचेही तपासात उघड झाले आहे.

-------------------------

अनोळखी ॲप घेताय आधी नियम वाचा

मोबाइलवर कोणतीही लिंक, ॲप डाऊनलोड करताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अनावश्यक लिंक ओपन करू नये, ए‌खादे ॲप डाऊनलोड करताना आधी त्याचे नियम व अटी वाचाव्यात त्यानंतर परमिशन द्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

------------------

ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी प्रथम डिजिटल तंत्रज्ञाची प्राथमिक माहिती करून घ्यावी. व्हाॅट‌्सॲप, फेसबुक आदी माध्यमांवर येणाऱ्या अनोळखी लिंक, ॲप डाऊनलोड करू नये. अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. तसेच ॲप डाऊनलोड करत असताना त्याबाबत आधी सर्व प्रक्रिया समजून घ्यावी. पैशांची डिमांड असेल तर वेळीच सावध व्हावे, अशी दक्षता घेतली तर फसवणूक टाळता येते.

- प्रतीक कोळी, उपनिरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन

Web Title: No call, no OTP, but money disappears from the bank!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.