अतिक्रमण धारकांचे पुढील आंदोलन महसूलमंत्र्यांच्या दारात, वंचितचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 21:39 IST2024-05-24T21:38:51+5:302024-05-24T21:39:08+5:30
प्रशांत शिंदे / अहमदनगर - तिसगावच्या अतिक्रमण हटाव मोहिमेची न्यायालयीन लढाई लढणार मात्र या पुढील आंदोलन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण ...

अतिक्रमण धारकांचे पुढील आंदोलन महसूलमंत्र्यांच्या दारात, वंचितचा इशारा
प्रशांत शिंदे /अहमदनगर - तिसगावच्या अतिक्रमण हटाव मोहिमेची न्यायालयीन लढाई लढणार मात्र या पुढील आंदोलन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी प्रवरा येथील निवास स्थानासमोर करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी दिला.
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील अतिक्रमण नियमित करावेत या मागणीसाठी गेल्या ३ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले अतिक्रमण धारकांचे उपोषण गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी दिलेल्या पत्रानंतर मागे घेण्यात आले. उपोषणकर्त्यांची माजी आमदार शिवाजीर कर्डिले, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, अरुण कडू पाटील, भगवान फुलसौंदर, काशिनाथ पाटील लवांडे यांनी भेट घेतली.
गटविकास अधिकाऱ्यांनी अतिक्रमण धारकांना दिलेल्या पत्रात म्हटले की, तिसगाव येथील अतिक्रमणाबाबत पाथर्डी पंचायत समिती अतिक्रमण धारकांच्या सुनावण्या घेऊन एकत्रित अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केला आहे.
या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने १३ जून २०२४ पर्यंत स्थगिती दिली आहे. ही बाब न्यायप्रविष्ठ असल्यामुळे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे अश्वासन दिले आहे. यानंतर अतिक्रमण धारकांनी तात्पुरते उपोषण मागे घेतले आहे. मात्र पुढील आंदोलन महसूलमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर करण्यात येईल, असा इशारा प्रा. किसन चव्हाण यांनी दिला.