अहमदनगर : नगर शहरात महापौर शिवसेनेचा आहे. राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यांच्या माध्यमातून नगर शहराचा विकास करण्याची संधी आहे. आगामी आमदारही शिवसेनेचाच होईल, त्यादृष्टीने सर्वांनी संघटन मजबूत करायचे आहे, अशी अपेक्षा शिवसेनेचे दक्षिण जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी व्यक्त केली.
नगर येथे शिवसंपर्क अभियानाचा शुक्रवारी समारोप झाला. यावेळी कोरगावकर बोलत होते. याच कार्यक्रमात ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, महापौर रोहिणी शेंडगे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, संजय शेंडगे, बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, सचिन शिंदे, श्याम नळकांडे, दत्ता जाधव, संतोष गेनप्पा, विजय पठारे, अमोल येवले, संग्राम शेळके, संग्राम कोतकर, बबलू शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी कोरगावकर म्हणाले, शिवसेनेेने नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षमय भूमिका घेतलेली आहे. प्रश्न सुटत असल्याने नागरिक शिवसेनेशी जोडले जात आहेत. शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यात शिवसैनिकांचे मोठे परिश्रम आहेत. राज्यात व महापालिकेत सत्ता असल्याने त्या माध्यमातून शिवसैनिकांनी नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे. राज्य शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून द्यावा. जुन्या-नव्यांचा मेळ घालून नगर जिल्ह्यात शिवसेनेचे संपर्क अभियान राबविण्यात आले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. यापुढील काळात राज्यातील मंत्र्यांना नगरमध्ये आणून जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न राहील.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे म्हणाले, शिवसैनिकांनी कायम नागरिक व स्व-पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहिले पाहिजे. नगर शहर हा सेनेचा बालेकिल्ला असल्याने हे संघटन अधिक मजबूत करावे. प्रास्ताविकात शहरप्रमुख दिलीप सातपुते म्हणाले, नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहण्याची शिकवण उपनेते स्व. अनिल राठोड यांनी दिली आहे. त्याच शिकवणुकीवर पक्ष संघटन मजबूत करावे. नगर शहरात पुढील काळात शिवसेनेच्या ७० ते ८० शाखा स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी विक्रम राठोड म्हणाले, युवक-विद्यार्थ्यांचे प्रश्न आक्रमकपणे सोडविल्याने युवकांमध्ये शिवसेनेबद्दल मोठे आकर्षण आहे.
याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, संदेश कार्ले आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले, तर अभिषेक कळमकर यांनी आभार मानले.
---------
फोटो - २४ शिवसेना
शिवसंपर्क अभियानाच्या समारोपप्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, महापौर रोहिणी शेंडगे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांच्यासह सेनेचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी.