भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक
By Admin | Updated: July 17, 2014 00:30 IST2014-07-16T23:19:08+5:302014-07-17T00:30:15+5:30
अकोले : मोसमी पावसाला तालुक्याचा घाटमाथा ओलांडण्यास तब्बल महिनाभर वाट पाहावी लागली असून मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्यानंतर शेवटच्या चरणात पुनर्वसू नक्षत्र बरसू लागले आहे.
भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक
अकोले : मोसमी पावसाला तालुक्याचा घाटमाथा ओलांडण्यास तब्बल महिनाभर वाट पाहावी लागली असून मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्यानंतर शेवटच्या चरणात पुनर्वसू नक्षत्र बरसू लागले आहे. मंगळवारी घाटघरला साडेपाच इंच पाऊस पडल्याची नोंद झाली असून गेल्या २४ तासांत २२० दलघफू नव्या पाण्याची आवक भंडारदरा धरणात झाली आहे. बुधवारी १२ तासांत १२ मिलीमिटर पाऊस पडला. दुपारनंतर पाऊस थंडावला होता.
तालुक्यात सर्वदूर पावसाचे वातावरण असून पूनर्वसू नक्षत्र रिमझिम सरींनी बरसले. पश्चिम आदिवासी भागात पावसाचा जोर होता, मात्र पूर्व भागात बुरबूर होती. पाऊस पडता झाल्याने आदिवासी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, भात आवणीसाठी मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.
काही भागात भात रोपांना पावसाने जीवदान दिले असले तरी आता गरवा वाण भात लावून उत्पादन घटणार आहे. हळवा वाण भात लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. कुमशेत, रतनवाडी, आंबीत, घाटघर भागात काही अंशी भात आवणीला सुरुवात झाली असल्याचे कृषी पर्यवेक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले.
मंगळवारी घाटघरला १३९, रतनवाडी- ८५, पांजरे- ३१, वाकी- २८, भंडारदरा- २२, कोतूळ- ६, निळवंडे- ५ मिमी पाऊस पडला. मात्र अकोले, देवठाणमधे पाऊस मोजणी यंत्राचा आकडा निरंक होता. भंडारदरा धरणात ८१९, तर निळवंडेत ४८५ दलघफू पाणीसाठा असून निळवंडेतून १ हजार ७०० क्युसेक वेगाने आवर्तन सुरु आहे. आंबीत तलाव ओसंडून वाहत असून बलठण, कोथळे, देवहंडी तलावांत मृतसाठ्याइतके पाणी आहे. पिंपळगाव खांड प्रकल्पात ७५ दलघफू पाणी अडवले गेले आहे. मुळा नदीपात्रातून २ हजार ५०० क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे. गतवर्षी १६ जुलैला भंडारदरा निम्मे भरले होते. घाटघर परिसरातील वीज गाजब झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)