आवश्यकता ३७ कोटींची, मंजूर सव्वा कोटी
By Admin | Updated: July 19, 2014 00:37 IST2014-07-18T23:28:20+5:302014-07-19T00:37:14+5:30
ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या ताब्यात असणाऱ्या साठवण बंधारे, कोल्हापूर बंधारे, गाव तळे आणि पाझर तलाव यांच्या दुरूस्तीसाठी निधीच उपलब्ध नाही.
आवश्यकता ३७ कोटींची, मंजूर सव्वा कोटी
ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर
जिल्हा परिषदेच्या ताब्यात असणाऱ्या साठवण बंधारे, कोल्हापूर बंधारे, गाव तळे आणि पाझर तलाव यांच्या दुरूस्तीसाठी निधीच उपलब्ध नाही. या सर्व तलावांची संख्या २ हजार ५१२ असून त्यापैकी २०० तलावांच्या दुरूस्तीसाठी ३७ कोटींची आवश्यकता असून जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून त्यासाठी अवघे १ कोटी २० लाख रूपये मंजूर झाले असल्याने लघु पाटबंधारे विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे.
जिल्ह्यात दुष्काळाच्या परिस्थितीत १९७० ते १९७२ या काळात आणि त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी साईट आणि निधी मिळाला त्या काळात मोठ्या प्रमाणात गाव तलाव, पाझर तलाव, कोल्हापूर बंधारे, साठवण बंधारे यांची निर्मिती झालेली आहे. या तलावांची निर्मिती झाल्यानंतर सुमारे ३० ते ४० वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. या काळात या तलावात गाळ साचणे, तलावाचा भराव, पाण्याची सांड वाहून जाणे, तलावातून पाण्याची गळती होणे आदीमुळे या तलावांची दुरूस्ती आवश्यक आहे.
जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून यासाठी निधी देण्यात येतो. मात्र, तलावांची वाढलेली संख्या आणि मिळणारा निधी यात मोठे अंतर असल्याने या तलावांची दुरूस्ती करावी कशी? असा प्रश्न जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागासमोर आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार १७३ साठवण बंधारे असून त्यातून १५ हजार ६०१ हेक्टर, १०५ कोल्हापूर बंधाऱ्यांतून २ हजार १७० हेक्टर, ८३७ पाझर तलावातून ४० हजार ७२९ हेक्टर, ३९८ गाव तलावातून १ हजार ९५८ हेक्टर, २ हजार २५५ जवाहर विहिरी असून २ हजार २५५ हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण झालेले आहेत.
मात्र, यातील बहुतांशी बंधारे, तलाव नादुरूस्त असून त्यात पाणी साठवण होत नसल्याने त्यातील २०० बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्याचा विचार जिल्हा परिषदेचा लघु पाटबंधारे विभाग करीत आहे. त्यासाठी ३७ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून निधी अभावी काम ठप्प आहे. जिल्हा परिषर सेस फंडातून १ कोटी २० लाख रुपये मंजूर झाले असून त्यातून एखादेच काम चालू आहे.
जिल्ह्यात १९७२ च्या दुष्काळात झालेल्या पाझर तलाव आणि बंधाऱ्यांच्या दुरूस्तीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी करण्यात आलेली आहे. तसेच याबाबत विभागीय आयुक्तांनाही प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत. या बंधाऱ्यांच्या दुरूस्तीसाठी सात ते आठ कोटींची आवश्यकता आहे. या बंधाऱ्यांची दुरूस्ती झाल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
-विठ्ठलराव लंघे,
अध्यक्ष, जिल्हा परिषद
बंधारे संख्या कंसात सिंचन क्षेत्र (हजारात)
साठवण बंधारे ११७३ १५,६०१ हेक्टर
कोल्हापूर बंधारे १०५ २,१७० हेक्टर
पाझर तलाव ८३७ ४०,७२९ हेक्टर
गाव तलाव ३९८ १,९५८ हेक्टर
जवाहर विहीर २२५५ २,२५५ हेक्टर