स्वारगेटच्या घटनेनंतर नीलेश लंके अचानक पोहोचले नगरच्या बसस्थानकात; पुढे काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 16:38 IST2025-02-28T16:37:11+5:302025-02-28T16:38:26+5:30

नीलेश लंके यांनी अचानक शहरातील बसस्थानकात जात प्रशासनाची पोलखोल केली आहे.

ncp mp Nilesh Lanke suddenly arrives at the nagar bus stand After the Swargate incident What happened next | स्वारगेटच्या घटनेनंतर नीलेश लंके अचानक पोहोचले नगरच्या बसस्थानकात; पुढे काय घडलं?

स्वारगेटच्या घटनेनंतर नीलेश लंके अचानक पोहोचले नगरच्या बसस्थानकात; पुढे काय घडलं?

NCP Nilesh Lanke : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीसोबत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनं राज्यभरात संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर राज्यातील बसस्थानकांच्या दुरवस्थेचा प्रश्नही चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर दक्षिणचे खासदार नीलेश लंके यांनी अचानक शहरातील बसस्थानकात जात प्रशासनाची पोलखोल केली आहे. "बसस्थानकात लाईट नाहीत, कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी खुर्च्या नाहीत, महिलांच्या स्वच्छतागृहात लाईटची सोय नाही, प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसमध्ये लाईट नव्हती. गोरगरीब, कष्टकरी महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार उदासीन आहे," अशा शब्दांत खासदार नीलेश लंके यांनी बसस्थानकातील सुरक्षा व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त करत एस.टी. महामंडळाच्या कारभारावर टीका केली आहे.

पुणे येथील स्वारगेट येथील तरुणीवरील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी गुरुवारी सायंकाळी पुणे बसस्थानकाला (स्वस्तिक चौक) भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार लंके म्हणाले की, "बसस्थानकाला भेट दिली असता स्थानकात स्वच्छता नसल्याचे निदर्शनास आले आहे. स्थानकात पंखे नाहीत. काही प्रमाणात सीसीटीव्ही आहेत. परंतु, महिलांच्या स्वच्छतागृहाचा प्रश्न गंभीर आहे. काही महिला प्रवाशांशी संवाद साधला असता स्थानकात महिलांसाठी स्वच्छतागृह आहेत. परंतु, तिथे लाइट नसतात. अशीच परिस्थती इतर बसस्थानकातही आहे, असे महिला प्रवाशांनी सांगितले. बसस्थानकात बसण्यासाठी बाकडे नाहीत. बाकडे नसल्याने हिंगोलीचे एक कुटुंब कोपऱ्यात बसलेले पाहायला मिळाले. स्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये लाईटची सोय नव्हती. प्रवाशांना अक्षरशः अंधारात जीव मुठीत धरून बसावे लागते. बसमधील चालकाच्या कॅबीनमध्येदेखील लाईट नाही. महिलांच्या सुरक्षेच्या कोणत्याच उपाययोजना नाहीत. त्यामुळे गुंडांची गैरकृत्य करण्याची हिंमत होते. सरकार उदासीन आहे. सरकार बसस्थानकांना कोणत्याही सुविधा पुरवीत नाही. बसने गोरगरीब कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील महिला प्रवास करत असतात. सरकारला गोरगरिबांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पण, माजी मंत्र्यांच्या मुलगा विमाने परदेशात जायला निघतो. त्याचे विमान काही तासात परत आणले जाते. पण, महिलांवर अत्याचार करणारे आरोपी सापडत नाहीत," अशा शब्दांत लंके यांनी सरकारचे वाभाडे काढले आहेत.

बसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची मागणी
बसमध्ये महिला व शाळेतील मुलींची छेड काढली जाते. अनेक मुलींनी तशा तक्रारी केलेल्या आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी बसमध्ये सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी परिवहन मंत्र्यांकडे ईमेलद्वारे करणार असल्याचं खासदार लंके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.
 

Web Title: ncp mp Nilesh Lanke suddenly arrives at the nagar bus stand After the Swargate incident What happened next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.