अहमदनगर : कोरोनामुळे वर्षभरापासून कामानिमित्त बाबा बाहेरच असतात. त्यांना पहिल्यासारखा कुटुंबाला वेळ देता येत नाही, घरी आले तरी त्यांना आमच्यात मिसळता येत नाही. माझ्या बाबांच्या कामाचे मात्र अनेकांकडून कौतुक होत आहे. माझे बाबा माझ्यासाठी हिरो आहेत. मलाही मोठे झाल्यानंतर त्यांच्यासारखेच काम करायला आवडेल, अशा प्रतिक्रिया पोलीस व डॉक्टरांच्या मुलांनी व्यक्त करत वडिलांच्या कामाचे कौतुक केले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावात गेल्या वर्षभरापासून पोलीस व डॉक्टर फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करत आहेत. त्यांच्या कामाचे तास वाढले आहेत. अशा परिस्थितीत पोलीस व डॉक्टरांना घरी वेळ देणे कठीण झाले आहे. ड्युटी आणि कुटुंब अशी दुहेरी जबाबदारी सांभाळताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशावेळी कुटुंबियांना तणावमुक्त ठेवून त्यांची मानसिकता सांभाळणे महत्त्वपूर्ण ठरत आहे. प्रत्यक्षात मात्र पोलीस आणि डॉक्टरांच्या कुटुंबियांनीही उद्भवलेल्या या कठीण परिस्थितीचा स्वीकार केल्याचे दिसत आहे. अशा संकटकाळात आम्ही आमच्या वडिलांबरोबर राहणार, त्यांना समजून घेणार, अशी भावना डॉक्टर व पोलिसांच्या मुलांनी व्यक्त केली आहे.
.........
कोरोनामुळे बाबांच्या कामाचे तास वाढले आहेत. अशा परिस्थितीत आम्ही त्यांना समजून घेणे गरजेचे आहे. माझे बाबा करत असलेल्या कामाचा मला अभिमान आहे. सध्या बाबांकडे कुठलाही हट्ट न करता, आम्ही सतत त्यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची काळजी घेतो.
- निकिता सुरसे, पोलीस पाल्य
..........
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन होते की नाही, हे पाहण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. माझे बाबाही अविरतपणे हे काम करत आहेत. लोकांमधून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. मला त्यांचा अभिमान असून, त्यांच्यासारखे काम करायला आवडेल.
- शुभम मरकड, पोलीस पाल्य
जिल्ह्यातील कोरोना योद्धे कार्यरत आरोग्य कर्मचारी
जिल्हा परिषद - १३१४
जिल्हा, ग्रामीण रुग्णालये - १२३३
राष्ट्रीय आरोग्य अभियान - ११००
--------------
जिल्ह्यातील पोलीस
पोलीस कर्मचारी - २९२६
पोलीस अधिकारी - १६२