अहमदनगरच्या वस्तू संग्रहालयाचे रूपडे पालटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 18:20 IST2017-12-31T18:11:25+5:302017-12-31T18:20:18+5:30
ऐतिहासिक ठेव्यांचे जतन करण्यासाठी आता नगरचे वस्तूसंग्रहालय नव्या रूपात नगरकरांसमोर येत आहे. संग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन महिन्यांत सुसज्ज संग्रहालय खुले होणार आहे.

अहमदनगरच्या वस्तू संग्रहालयाचे रूपडे पालटले
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : ऐतिहासिक ठेव्यांचे जतन करण्यासाठी आता नगरचे वस्तूसंग्रहालय नव्या रूपात नगरकरांसमोर येत आहे. संग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन महिन्यांत सुसज्ज संग्रहालय खुले होणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर नव्या रंगातील, नव्या ढंगातील संग्रहालय नगरकरच नव्हे, तर राज्याचे खास आकर्षण ठरेल.
जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर झालेले अडीच कोटी रुपये खर्चून हे नूतनीकरण होत आहे. संग्रहालयाच्या इमारतीचे आतून-बाहेरून काम झाले असून, रंगरंगोटीही उरकली आहे. वरच्या मजल्यावर नव्या भव्य शोकेश तयार करण्यात आल्या असून, त्यात वेगवेगळे विभाग केले आहेत. शस्त्र विभागात मराठा, मोगलकालीन दुर्मिळ तलवारी, ढाली, दांडपट्टे, कट्यार, ब्रिटिशकालीन उठावातील तोड्याच्या बंदुका, सैन्यांचे मुकुट आदी शस्त्रांची मांडणी केली आहे. त्यात विद्युतरोषणाई केली असून, माहितीफलकही असणार आहेत. शेजारीच कॉईन गॅलरी असून, त्यात सातवहन काळापासून आतापर्यंतची सोने-चांदी, तांबे, धातू, लोखंड व दगडी सुमारे पाच हजार नाणे पाहण्यासाठी खुली असतील. याचबरोबरच पुरातत्त्व विभागात निजामकालीन खापरी नळयोजनेतील नळ, जिल्ह्यात उत्खनानात सापडलेल्या वस्तू, जुन्या जन्मकुंडल्या, पोथी, लघुचित्र व धार्मिक चित्र असतील.
ग्रंथालयात इसवी सन पूर्वकाळापासून अगदी स्वातंत्र्यलढ्यापर्यंतची संदर्भग्रंथे, शिलालेख आहेत. मौल्यवान वस्तू गॅलरीत सोन्याचा मुलामा असलेली तलवार, चांदीची शस्त्रे, वंशावळी यासह दुर्मिळ वस्तू आहेत. उत्तम इंटेरिअर व फर्निचर करून ही गॅलरी संग्रहालयाचे खास आकर्षण ठरत आहे.
खालच्या मजल्यावर मूर्तीदालन असून, त्यात पंचधातू, संगमरवरी, दगडी मूर्ती, नगर दर्शन विभागात नगरची पर्यटन, ऐतिहासिक स्थळांची माहिती, गणेश दालनात आतापर्यंची सर्व गणेशमूर्ती, छायाचित्रांचे प्रदर्शन, भुईकोट किल्ल्यात जर्मन कैद्यांनी काढलेली चित्रे, लाकडी साहित्य असणार आहे. तळमजल्यात उत्तम कॉन्फरन्स हॉल असून, तेथे सर्व संगणकीकरण झालेले आहे. संग्रहालयात असणाºया पंधरा हजारांपैकी दोन हजार पुस्तकांचे स्कॅनिंग झाले असून, अन्य पुस्तके व दुर्मिळ दस्तांचेही डिजिटलायझेशन होत आहे.
संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर शहाजीराजे भोसले व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्यांवर नक्षीकाम असलेली छत्री उभारण्यात आली आहे.
संग्रहालयाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. रवींद्र साताळकर व अभिरक्षक संतोष यादव यांच्या देखरेखीखाली ही कामे होत आहेत. भविष्यात हे वस्तू संग्रहालय पर्यटकांसाठी, विविध शाळांसाठी सहली, तसेच इतिहासप्रेमींसाठी खास आकर्षण व माहितीचा खजिना ठरणार आहे.
वस्तू संग्रहालय नगरच्या वैभवात नक्कीच भर टाकणारे ठरणार आहे. कुणाकडे ऐतिहासिक, दुर्मिळ वस्तू, कागदपत्रे असतील, तर त्यांनी संग्रहालयासाठी द्यावे. त्याचेही उत्तम जतन व मांडणी करण्यात येईल.
- संतोष यादव, अभिरक्षक, वस्तुसंग्रहाल