महावितरणच्या कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; अहमदनगर येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 10:35 IST2022-02-24T10:35:16+5:302022-02-24T10:35:39+5:30
घारगावात वायरमनची गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं खळबळ माजली आहे.

महावितरणच्या कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; अहमदनगर येथील घटना
घारगाव (जि. अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील घारगाव महावितरणच्या एका वायरमनने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रदीप शांताराम कडाळे ( वय २५ , रा. कडाळेवस्ती , घारगाव, ता. संगमनेर ) असे या वायरमनचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडाळे हे गुरुवारी (दि. २३ ) नेहमीप्रमाणे घारगाव महावितरण येथे कार्यरत होते. अकलापुर रोड येथील एका कॉम्प्लेक्समध्ये ते राहण्यास होते. गुरुवारी रात्री साडे बारा वाजलेच्या दरम्यान कडाळे यांनी बेडरूमचा दरवाजा लावला ते दरवाजा उघडत नसल्याने त्यांच्या पत्नी पूजा यांनी कडाळे यांच्या मित्रांना फोनवरून कळविले. मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कडाळे यांच्या मित्रांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कडाळे यांनी बेडरूम मधील फॅन लटकवण्याच्या लोखंडी हुकाला कापडी बेडशीट बांधून गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये खबर देण्यात आली.
पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय विखे,पोलीस नाईक राजेंद्र लांघे,चालक नामदेव बिरे यांनी जाऊन पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह खाली घेण्यात आला. शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात कडाळे यांंचा मृतदेह पाठवण्यात आला आहे. वायरमन कडाळे हे या ठिकाणी पत्नीसोबत दोघेच राहत होते. कडाळे यांनी आत्महत्या का केली, याबाबत कारण स्पष्ट होऊ शकले नाही. गणेश विठ्ठल लेंडे (वय-२५, रा. खंदरमाळ) यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक राजेंद्र लांघे हे करीत आहेत.