आंदोलनांनी पारनेर दणाणले
By Admin | Updated: June 19, 2014 00:10 IST2014-06-18T23:37:44+5:302014-06-19T00:10:16+5:30
पारनेर : गारपीटग्रस्त भागाचे पंचनामे करताना तलाठी व कृषी सहाय्यकांनी दुजाभाव केल्याचा आरोप करीत आपद्ग्रस्त शेतकऱ्यांनी पारनेर तहसील कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन केले.
आंदोलनांनी पारनेर दणाणले
पारनेर : गारपीटग्रस्त भागाचे पंचनामे करताना तलाठी व कृषी सहाय्यकांनी दुजाभाव केल्याचा आरोप करीत आपद्ग्रस्त शेतकऱ्यांनी पारनेर तहसील कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन केले. तर महा-ई-सेवा केंद्रांच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना दाखले वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना हजारो रूपयांचा फटका बसत आहे, अशी तक्रार करीत युवकांनी दोन तास ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनांनी पारनेर तहसील कार्यालय दणाणून गेले होते.
दोन महिन्यापूर्र्वी झालेल्या गारपिटीत फळे व पिके यांच्या नुकसानीचे पंचनामे करताना पोखरी गावातील तलाठी व कृषी सहाय्यकांनी काही ठराविक शेतकऱ्यांचे पंचनामे करून इतर शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप करीत सोमवारी जिल्हा परिषद सदस्य सुजीत झावरे, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दीपक नाईक, योगेश मते यांनी शेतकऱ्यांसह पारनेर तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
झावरे म्हणाले, पवार नावाच्या व्यक्तीचे पोखरी गावात क्षेत्र नसताना त्याच्या नावावर अनुदान आले आहे, अशी अनेक उदाहरणे असून तलाठी व कृषी सहाय्यकांचा हा दुजाभाव शेतकऱ्यांना नुकसानकारक असल्याचे सांगितले.
प्रभारी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी दिलीप कुलकर्णी यांच्यावर शेतकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. वंचित लाभ्यार्थ्यांबाबत निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर झावरे यांनी पालकमंत्री मधुकर पिचड, जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन चर्चा केली. त्यांनी वंचित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी पुन्हा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिल्यानंतर झावरे व समर्थकांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी बाजार समितीचे उपसभापती अरूण ठाणगे, परशराम शेलार, सतीश पिंपरकर, तुकाराम शिंदे, सोमा दुधवडे व शेतकरी हजर होते.
दोन आठवड्यांपासून पारनेर येथे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची दाखल्यांसाठी महा-ई-सेवा केंद्रांवर गर्दी होत आहे. दोनच केंद्र चालू असल्याने विद्यार्थ्यांना साधी कागदपत्रे कधी मिळणार याची पावतीही तीन-तीन दिवस मिळत नसल्याने महाविद्यालयात प्रवेश घेताना अनुदानीत ऐवजी विनाअनुदानीत तुकडीत प्रवेश मिळून मोठी फी भरावी लागते, असे राहुल शिंदे, शैलेंद्र औटी, सतीश म्हस्के, विलास मते, गणेश कावरे यांनी तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिले. आपल्याकडे दाखले आल्यावर प्रलंबित रहात नसल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक दाखल्यांची उदाहरणे दिल्यानंतर आपण तातडीने यात लक्ष घालून विद्यार्थ्याना त्रास होणार नाही याची काळजी घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले. (तालुका प्रतिनिधी)
अनागोंदीचा हजारो रूपयांचा फटका
पारनेरचे तहसीलदार डॉ.विनोद भामरे यांची बदली झाल्यानंतर कामचुकारपणा करणाऱ्या महा-ई-सेवा केंद्र चालकांमुळे विद्यार्थ्याना उत्पन्नाचे दाखले यासह इतर दाखले मिळण्यास विलंब होत असल्याच्या निषेधार्थ पारनेर तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल शिंदे, आत्मा कृषी समितीचे अध्यक्ष शैलेंद्र औटी यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांनी मंगळवारी दोन तास ठिय्या आंदोलन केले.