मोटारसायकल चोर पकडला; चार मोटारसायकली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 17:09 IST2020-08-09T17:03:14+5:302020-08-09T17:09:52+5:30
राहुरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोटारसायकल चोर रामदास दौलत कोळसे (वय ३२, रा. गडदे आखाडा) यास रविवारी (१० आॅगस्ट) अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

मोटारसायकल चोर पकडला; चार मोटारसायकली जप्त
राहुरी : पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोटारसायकल चोर रामदास दौलत कोळसे (वय ३२, रा. गडदे आखाडा) यास रविवारी (१० आॅगस्ट) अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
राहुरी शहरातील मल्हारवाडी चौकात विना क्रमांकाच्या हिरो होंडा गाडीवर रामदास कोळसे हा जात असताना राहुरी पोलिसांनी त्यास हटकले. चोरीस गेलेल्या दुचाकींची विक्री करण्यासाठी एक व्यक्ती मल्हारवाडी चौकात येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रविवारी मल्हारवाडी चौकात नाकाबंदी केली होती. तेव्हा रामदास दौलत कोळसे हा या जाळ्यात अडकला .
पोलिसानी कोळसे याच्याकडे चौकशी केली असता तो चुकीची माहिती सांगत असल्याचे लक्षात आल्याने त्याला पोलिसी खाक्या दाखविला. यानंतर त्याने आपण अन्य साथीदारांच्या मदतीने आणखी तीन मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्याने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन राहुरी पोलिसांच्या पथकाने तीन चोरीस गेलेल्या मोटारसायकली जप्त केल्या. त्याच्याकडून त्याच्या इतर दोन साथीदारांची माहिती मिळाली आहे. त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांचे पथक करीत आहे. या टोळीकडून अधिक चोरीस गेलेल्या मोटारसायकली हस्तगत होण्याची शक्यता आहे.