मिरी-तिसगाव योजनेची पाईपलाईन फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:19 IST2021-07-25T04:19:50+5:302021-07-25T04:19:50+5:30
करंजी : मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणीयोजनेची करंजीजवळील बेलओढा येथे पाईपलाईन फुटून लाखो लीटर पाणी वाया गेले. या भागात पिण्याच्या पाण्याची ...

मिरी-तिसगाव योजनेची पाईपलाईन फुटली
करंजी : मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणीयोजनेची करंजीजवळील बेलओढा येथे पाईपलाईन फुटून लाखो लीटर पाणी वाया गेले. या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असतानाच ही पाईपलाईन फुटल्याने दुष्काळात तेरावा महिना अशीच अवस्था या भागातील झाली आहे.
राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस होत असताना पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या करंजी, दगडवाडी, वैजुबाभुळगाव, खांडगाव, लोहसर, चिचोंडी, शिराळ परिसरातील गावांमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने विहिरींच्या पाण्याने तळ गाठलेला आहे. काही भागात आजही पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. या भागातील अनेक गावांना मिरी-तिसगाव प्रादेशिक योजनेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. या योजनेचे करंजीसह इतर गावांना पाणीपुरवठा होत असताना करंजीजवळील बेलओढा येथे या योजनेची पाईपलाईन फुटून लाखो लीटर पाणी वाया गेले.
बेलओढ्यातील कैलास शिंदे यांच्या घरासमोरील शेताला या पाण्याने तलावाचे स्वरूप आले होते. या भागात आधीच पाणीटंचाई आहे आणि त्यात या योजनेची पाईपलाईन फुटल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. पाईपलाईन त्वरित दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करंजी, दगडवाडी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
---
२४ करंजी
करंजीजवळ मिरी-तिसगाव पाणी योजनेची पाईपलाईन फुटल्याने शेतात साचलेले पाणी.