अल्पवयीन मुलीवर अत्याचार; डॉक्टरवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 22:05 IST2025-04-06T22:02:40+5:302025-04-06T22:05:11+5:30
संगमनेरातील घटना : नाशिक पोलिसांनी घेतले ताब्यात

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; डॉक्टरवर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर (जि. अहिल्यानगर) : कनिष्ठ महाविद्यालयीन १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने शारीरिक अत्याचार केले. पीडित मुलगी संबंधित डॉक्टरच्या रुग्णालयात उपचार घेत होती. ही घटना रविवारी (दि. ६) पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास शहरातील कर्पे हॉस्पिटल येथे घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात डॉ. अमोल कर्पे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित मुलगी शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. शुक्रवारी (दि. ४) ती महाविद्यालयात आली. त्यानंतर तिला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने डॉ. कर्पे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिच्यावर तेथे उपचार सुरू होते. रविवारी पहाटे डॉ. कर्पे याने मुलीच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर त्याने मुलीला बाहेर बोलावून घेत टेरेसवर नेले. तिथे तिच्याशी गैरवर्तन केले. मुलीने विरोध केला असता डॉ. कर्पे याने बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुणाला काही सांगितल्यास तुला जिवंत ठेवणार नाही, असा दमही दिल्याचे पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर काही वेळ तणाव निर्माण झाला होता. संबंधित डॉक्टरच्या हॉस्पिटलजवळ पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या इतरही कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक फराहनाज पटेल अधिक तपास करीत आहेत.
गुन्हा करून नाशिकला पळाला
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा डॉ. कर्पे याचा पोलिस शाेध घेत होते. तो नाशिक येथे पळून गेला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास केला. नाशिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख, पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग आणि पोलिस कर्मचारी डॉ. कर्पे याला ताब्यात घेण्यासाठी नाशिककडे रवाना झाले.