पाणी वळविण्यासाठी पंतप्रधानांना भेटणार
By Admin | Updated: June 13, 2014 01:14 IST2014-06-13T00:44:03+5:302014-06-13T01:14:01+5:30
कोपरगाव : ८० टीएमसी पाणी गोदावरी, प्रवरा, मुळा खोऱ्यात वळविण्याच्या मुद्यांवर आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती आ़ अशोक काळे यांनी दिली़

पाणी वळविण्यासाठी पंतप्रधानांना भेटणार
कोपरगाव : पश्चिमवाहिनी नद्यांमधून समुद्राला वाहून जाणारे सुमारे ८० टीएमसी पाणी गोदावरी, प्रवरा, मुळा खोऱ्यात वळविण्याच्या मुद्यांवर आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती आ़ अशोक काळे यांनी दिली़
या प्रश्नाबाबत नुकतीच जलसंपदा मंत्र्यांनी बैठक घेतली, मात्र पाणी वळविण्यासाठी लागणारा निधी केंद्र सरकारकडूनच मिळणार असल्याने पंतप्रधानांशी चर्चा करणे महत्त्वाचे ठरेल, असे आ़ काळे म्हणाले़ महाराष्ट्रातील सह्याद्री घाटमाथा आणि पश्चिमवाहिनी नद्यांमधून पावसाच्या वाहून जाणाऱ्या पाण्यापैकी सुमारे ८० टीएमसी पाणी पूर्वेकडे जाऊ शकते़ यासाठी महाराष्ट्र शासनाने २००१ मध्ये एका समितीची स्थापना केली़ या समितीनेही त्याबाबत अनुकूल अहवाल दिलेला आहे़ मात्र शासनाने निष्क्रीय भूमिका घेतल्यामुळे आम्ही २०१२ साली मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली़ याबाबत लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे़ मात्र तब्बल बारा वर्षे आघाडी सरकार झोपलेले होते़ आता त्यांना जाग आली असून त्यांनी सर्वेक्षणाच्या सूचना दिल्याचे आ़ काळे यांनी म्हटले आहे़
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान पाणी वळविण्याचे संकेत दिले होते़ त्यामुळे आपण स्वत: व खा. सदाशिव लोखंडे मोदी यांच्यासह केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, जलसंपत्ती नियामक मंडळाच्या अध्यक्षांची भेट घेणार आहोत, असेही काळे म्हणाले़
(प्रतिनिधी)