महापौरांचा स्वीय सहायक लाचलुचपतच्या जाळ्यात

By Admin | Updated: May 23, 2016 23:22 IST2016-05-23T23:12:15+5:302016-05-23T23:22:16+5:30

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेतील महापौरांचे स्वीय सहायक बाबू चोरडिया यास चार हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहात पकडले.

The mayor's acceptance is in the back of the bribery | महापौरांचा स्वीय सहायक लाचलुचपतच्या जाळ्यात

महापौरांचा स्वीय सहायक लाचलुचपतच्या जाळ्यात

मनपा : सत्तापक्षातील नगरसेविकेच्या मुलाने दिली एसीबीकडे तक्रार
अहमदनगर : अहमदनगर महापालिकेतील महापौरांचे स्वीय सहायक बाबू चोरडिया यास चार हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहात पकडले. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास महिला बालकल्याण समितीच्या कार्यालयात लाचेचा हा प्रकार घडला. महापौरांच्या स्वीय सहाय्यकास लाच घेताना पकडण्यात आल्याची घटना महापालिकेच्या इतिहासात प्रथमच घडली.
महापौर अभिषेक कळमकर यांचे प्रभारी स्वीय सहायक म्हणून बाबू चोरडिया हे महापालिकेत काम करीत आहेत. नगरसेविका कलावती शेळके या वृध्द असल्याने त्या मुलगा काका शेळके याच्या मदतीने प्रभागातील कामे पाहतात. म्युनिसिपल कॉलनीतील इलेक्ट्रीक पोल स्थलांतरित करण्याचे काम विकास भार निधीतून करण्याचा प्रस्ताव शेळके यांनी प्रशासनाकडे दिला होता. त्यासाठी ५० हजार रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र हे काम विकासभार निधीत खतविण्यासाठी दहा टक्केप्रमाणे पाच हजार रुपये द्यावे लागतील अशी अट चोरडिया याने शेळकेंसमोर ठेवली. शेळके यांनी वाटाघाटी करून चार हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली. दरम्यान काका शेळके याने नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तशी तक्रार दिली. ठरल्यानुसार सोमवारी शेळके चार हजार रुपये घेऊन महापालिकेत आले. कलावती शेळके या महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती असल्याने काका शेळके त्या कार्यालयात बसले. तेथून त्यांनी चोरडिया यांना अगोदर काम खतव अन् पैसे घेऊन जा असा निरोप दिला. त्यानंतर चोरडिया काम खतवून शेळकें कडे पैसे घेण्यासाठी गेले असता लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात चोरडिया पैसे घेताना रंगेहात पकडले गेले. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असून शेळके या सत्तापक्षाच्या गटनोंदणीत आहेत. सत्तापक्षाच्या नगरसेविकेच्या कामासाठीच पैसे मागण्यात येत असल्याचा प्रकार या घटनेतून समोर आला. चोरडिया यास लाच घेताना पकडल्याचे वृत्त पसरताच कर्मचारी व महापालिकेत उपस्थित असलेल्या ठेकेदारांनी महापौर दालनाकडे धाव घेतली. गर्दीतून वाट काढत पोलिसांनी चोरडिया यास ताब्यात घेत अटक केली. महापालिकेत महापौरांच्या स्वीय सहाय्यकाला लाच घेताना पकडल्याची घटना महापालिकेच्या इतिहासात प्रथमच घडली. चोरडिया हे नगर परिषद असताना नगराध्यक्षांचे स्वीय सहायक होते. २००३ साली महापालिका झाल्यानंतर सलगपणे ते महापौरांचे स्वीय सहाय्यक म्हणून कामकाज पाहत होते. चोरडिया यांच्या अटकेनंतर नगरच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चेला उधाण आले.
नेत्याचा फोन
काका शेळके यांनी चोरडियांवर ट्रॅप घडवून आणल्याची माहिती क्षणातच राष्ट्रवादीच्या नेत्यांपर्यंत पोहचली. त्यातील एका ज्येष्ठ नेत्याने थेट शेळके यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करून ‘आमचे नाव तर नाही ना घेतले’ याची खातरजमा केली. विशेष म्हणजे कलावती शेळके व महापौर अभिषेक कळमकर यांचा प्रभाग एकच आहे. शेळके अपक्ष निवडून आल्यानंतर त्या राष्ट्रवादीसोबत शहर विकास आघाडीत गटनोंदणीच्या सदस्या आहेत.

Web Title: The mayor's acceptance is in the back of the bribery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.