Ahilyanagar Fire:अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यात आगीत होरपळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नेवासा फाटा येथील फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीत पाच जणांचा जळून मृत्यू झाला. पीडित कुटुंब फर्निचर दुकानाच्या वर राहत होते. त्यामुळे ते आगीच्या कचाट्यात सापडलं आणि ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे.
नेवासा फाटा येथे रात्री उशिरा मयूर रासणे यांच्या फर्निचर दुकानात लागलेल्या भीषण आगीत कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पती, पत्नी, त्यांची दोन लहान मुले आणि एक वृद्ध महिला यांचा समावेश आहे. ही आग इतकी भयानक होती की कुटुंबातील सदस्य बाहेर पडू शकले नाहीत आणि जिवंत होरपळले गेले. आग इतकी वेगाने पसरली की रासने कुटुंबातील पाचही सदस्यांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.
दुकानच्यावर मयूर रासणे हे आपल्या कुंटूबासमवेत राहत होते. रात्री लागलेल्या फर्निचर दुकान आणि घराला लागलेल्या आगीत रासने कुटुंबातीलमयूर अरुण रासने वय (४५ वर्ष),पायल मयूर रासने वय (३८ वर्ष),अंश मयूर रासने (वय १० वर्ष),चैतन्य मयूर रासने (वय ७ वर्ष),एक वृद्ध महिला (अंदाजे वय ७०) यांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत यश किरण रासने हा जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप अधिकृतपणे याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. स्थानिकांनी सांगितले की आग इतकी तीव्र होती की जवळचे लोकही मदतीसाठी वेळेवर पोहोचू शकले नाहीत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने संपूर्ण घर आणि दुकान व्यापले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.