विवाहित तरुणी प्रियकरासोबत घरातून गायब; १० दिवसांनी भयंकर अवस्थेत आढळला दोघांचाही मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 11:06 IST2025-03-24T11:06:04+5:302025-03-24T11:06:47+5:30
प्रसाद याचा मृतदेह एका झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत, तर भाग्यश्री हिचा मृतदेह जमिनीवर होता.

विवाहित तरुणी प्रियकरासोबत घरातून गायब; १० दिवसांनी भयंकर अवस्थेत आढळला दोघांचाही मृतदेह
Ahilyanagar Crime: एका प्रेमी युगुलाचे मृतदेह आढळून आल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी शिवारात घडली आहे. शनिवारी रात्री ही घटना उघडकीस आली आहे. प्रसाद सुरेश मरकड (वय २४), भाग्यश्री शंकर वखरे (वय २३) असे मृत जोडप्याचे नाव आहे. पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी परिसरातील घुमटवाडीच्या शिवारात या जोडप्याचे मृतदेह वनविभागाच्या हद्दीतील जमिनीवर आढळून आला आहे.
प्रसाद याचा मृतदेह एका झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत, तर भाग्यश्री हिचा मृतदेह जमिनीवर होता. दोघांचे मृतदेह पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलिस निरीक्षक हरीश भोये, विलास जाधव या अधिकाऱ्यांसह पोलिस पथकाने ताब्यात घेतले. घटनास्थळी दोघांचे मृतदेह हे अर्धवट जळालेल्या स्थितीत होते. भाग्यश्रीच्या मृतदेहाचा काही भाग वन्य प्राण्यांनी खाल्लेला आढळून आला आहे. वनविभागाचा हा परिसर असल्याने येथील परिसराला आग लागल्याने हे मृतदेह जळाले असावेत, अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
पोलिसांना घटना घडलेल्या ठिकाणीच विषारी औषध, थंडपेयाच्या रिकाम्या बाटल्या मिळाल्या आहेत. त्यामुळे या घटनेचा सर्व बाजूने पोलिस तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच, पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक हरीश भोये हे घटनेचा तपास करत आहेत. पोलिस हेडकॉन्स्टेबल सुहास गायकवाड हे मदत करत आहेत.
१० दिवसांपासून होते बेपत्ता
प्रसाद व भाग्यश्री हे दोघेही गेल्या दहा दिवसांपासून घर सोडून बाहेर होते. या दोघांच्या नातेवाइकांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात तशी तक्रार दाखल केली होती. प्रसाद मरकड हा अविवाहित तरुण होता, तर भाग्यश्री वखरे हिचा विवाह झाला असून, तिला एक मुलगा आहे.