प्रत्येक गावाला एक माणूस
By Admin | Updated: April 20, 2016 23:43 IST2016-04-20T23:40:58+5:302016-04-20T23:43:27+5:30
अहमदनगर : पीक विमा योजनेतील निकष आता बदलले असून, शेतकऱ्यांचा हिस्सा कमी करण्यात आला आहे़

प्रत्येक गावाला एक माणूस
अहमदनगर : पीक विमा योजनेतील निकष आता बदलले असून, शेतकऱ्यांचा हिस्सा कमी करण्यात आला आहे़ यापूर्वी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग ४८ टक्क्यांपर्यंत होता़ तो ७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे़ पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, यासाठी प्रत्येक गावासाठी एक कर्मचारी नेमण्याचे नियोजन आहे, असे प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी सांगितले़
‘प्रशासन-जनता संवाद’ या ‘लोकमत’च्या उपक्रमात बुधवारी बऱ्हाटे यांनी ‘लोकमत’च्या संपादकीय टीमशी संवाद साधला. बऱ्हाटे म्हणाले, सरकारने जुन्या पीक योजनेत बदल केले आहेत़ हे बदल सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावेत, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घ्यावा, यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एका गावात विमा योजनेच्या काळात नेमण्यात येणार आहे़ त्यांनी संबंधीत गावात जाऊन योजनेतील बदल सांगून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे़ नवीन योजनेत शेतकऱ्यांचा हिस्सा कमी करण्यात आला आहे़ त्यामुळे पूर्वी असलेला ४८ टक्के सहभाग वाढवून तो ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे़ हे करताना ज्या मंडळातून पीक विमा योजनेत आतापर्यंत कमी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे, त्या मंडळावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे़ त्यामुळे विमा योजनेतील सहभाग वाढू शकतो़(प्रतिनिधी)
मागेल त्याला शेततळे, या योजनेतून शेततळे घेण्यासाठी जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी आॅनलाईन प्रस्ताव दिले आहेत़ मात्र, जिल्ह्यासाठी २३९२ शेततळ्यांचे उद्दिष्ट असल्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांचा पुढील उद्दिष्टात समावेश केला जाईल़ ‘फर्स्ट कम, फर्स्ट रेफरन्स’नुसार पहिल्या २३९२ शेतकऱ्यांना या योजनेतून शेततळ्यासाठी अनुदान मिळणार आहे़ तसेच दारिद्य्ररेषेखालील व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला यात प्राधान्य देण्यात येणार असल्याचे बऱ्हाटे यांनी सांगितले़
‘जलयुक्त’मध्ये ७० टक्के काम कृषी विभागाचे
जलयुक्त शिवार योजनेत सर्वाधिक ७५ टक्के काम कृषी विभागाच्यामार्फत करण्यात आले आहे़ नाला बल्डिंग, सीसीटी बंधारे, सलग समतल चर, केटीवेअर अशी विविध जलसंधारणाची कामे या योजनेतून करण्यात आली आहेत़ केटीवेअर, बंधाऱ्यांमध्ये पावसाच्या पाण्यात वाहून येणारा गाळ अडविल्यास त्याचे आयुष्य वाढते़ पावसाळ्यात पाचवेळा चर भरतील आणि जिरतील, असे आमचे नियोजन आहे़ त्यातून पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे़
मका, तूर, उडीद, मूग पिकाखाली क्षेत्र वाढणार
कमी पावसामुळे उसाखालील क्षेत्रात मोठी घट झाली आहे़ हे क्षेत्र यंदा कांदा पिकाखाली आले आहे़ आता कांद्याचे रिकामे होणारे क्षेत्र मका, तूर, उडीद, मूग या पिकांखाली येऊन त्यांचे क्षेत्र वाढणार आहे़ कृषी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेती पद्धत विकसित करावी लागणार आहे़ काटेकोरपणे शेतीचे नियोजन व रासायनिक खते, औषधांवरील खर्च कमी करण्यावर भर राहील़ खत वापराचे प्रमाण ठरविले जाईल़ ३६ गटांमध्ये झिरो बजेट शेतीचा उपक्रम तीन वर्षांसाठी राबविण्या येणार आहे, असे बऱ्हाटे म्हणाले़