दातीर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:19 IST2021-04-19T04:19:32+5:302021-04-19T04:19:32+5:30
राहुरी शहरातील पत्रकार रोहिदास दातीर यांची ६ एप्रिल रोजी अपहरण करून हत्या झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात स्थानिक ...

दातीर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या
राहुरी शहरातील पत्रकार रोहिदास दातीर यांची ६ एप्रिल रोजी अपहरण करून हत्या झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यापूर्वीच दोन आरोपींना जेरबंद केलेले आहे. मात्र, मुख्य आरोपी कान्हू मोरे व अक्षय कुलथे हे गेल्या बारा दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. माजी मंत्री शिवाजी कर्डिले, माजी मंत्री राम शिंदे यांनी सदर पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर गंभीर आरोप करत सीआयडी चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले होते. नंतर हत्या प्रकरणाचा तपास राहुरी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्याकडून काढत डीवायएसपी संदीप मिटके यांच्याकडे वर्ग केला होता. मिटके यांच्या पथकाने रविवारी यातील मुख्य आरोपी कान्हू मोरे याला ताब्यात घेतले. जिल्हा पोलीसप्रमुख मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मिटके, योगेश देशमुख, राजेंद्र आरोळे, सुरेश औटी, नितीन चव्हाण, रवींद्र मेढे, नितीन शिरसाठ आदींनी ही कारवाई केली.