Maharashtra local Body Election : राज्यातील पक्षफुटीनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्याचा परिणाम लोकसभा व विधानसभेला फारसा जाणवला नाही. परंतु, नगरपालिका निवडणुकीत हा कळीचा मुद्दा बनला आहे. महायुतीत असले तरी एकमेकांचे स्पर्धक असलेली तालुक्यांतील प्रमुख राजकीय घराणी या निवडणुकीत एकत्र येण्यास इच्छुक नाहीत. त्यांना नगरपालिका स्वबळावर लढवून ताकद आजमावायची आहे. कार्यकर्त्यांचाही तोच सूर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिकांत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असा सामना पाहायला मिळणार आहे.
नगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. ही निवडणूक एकत्र लढवायची की स्वतंत्र, याचा निर्णय महाविकास आघाडी व महायुतीने जाहीर केलेला नाही. ऐनवेळी महायुतीचा निर्णय होईलही. परंतु, एकमेकांची विरोधक असलेली तालुक्यांतील राजकीय घराणी एकत्र कशी येणार? हा खरा मुद्दा आहे.
बहुतांश तालुक्यांत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते एकमेकांचे राजकीय स्पर्धक आहेत. त्यांच्यात गेल्या अनेक वर्षापासूनचा राजकीय संघर्ष आहे. त्यामुळे महायुतीत असले तरी त्यांचे सूर अजून जुळलेले नाहीत. ते महायुतीच्या झेंड्याखाली एकत्र येण्यास इच्छुक नाहीत. कारण तसे केल्यास आपले राजकीय अस्तित्व धोक्यात येईल, अशी त्यांना भीती आहे.
शेवगाव पाथर्डीमध्ये चित्र काय?
शेवगाव- पाथर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले व भाजपच्या आमदार मोनिका राजळे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. ते नगरपालिकेत एकत्र कसे येणार. त्यांनी स्वबळाची तयारी सुरू केली आहे. श्रीगोंद्यात भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र नागवडे, माजी आमदार राहुल जगताप यांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष आहे. तिथे भाजप व राष्ट्रवादीने स्वबळाची तयारी सुरू केली आहे.
रोहित पवारांच्या मतदारसंघात काय घडणार?
जामखेडमध्ये अजित पवार गटाची ताकद नाही. तिथे शरद पवार गटाचे रोहित पवार आमदार आहेत. त्यांच्याविरोधात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. राहुरीत माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे चुलते अरुण तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत. ते महायुतीसोबत राहतील, असे वाटत नाही. त्यामुळे तिथे भाजप स्वबळावर लढण्याची शक्यताआहे.
बाळासाहेब थोरातांच्या महायुतीचा निर्णय काय?
संगमनेरमध्ये शिंदेसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे तिघे एकत्रित निवडणुकीला सामोरे जातील. कारण तिथे काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात संघर्ष आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांच्यात टोकाचा संघर्ष झाला. तो याही निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
श्रीरामपूरमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र येताना दिसत आहेत. नेवासा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चंद्रशेखर घुले आहेत. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. माजी आमदार शंकरराव गडाख यांचे कार्यकर्ते शेतकरी क्रांतिकारी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.
शेवगावात घुले महायुतीबाहेर, तर नेवाशात महायुतीत
माजी आमदार चंद्रशेखर घुले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत. अजित पवार गट राज्यात भाजपसोबत आहे. असे असले तरी घुले यांनी शेवगाव नगरपालिकेत स्वबळाची तयारी सुरू केली आहे. नेवाशात मात्र ते शिंदेसेनेचे आमदार विठ्ठल लंघे यांच्यासोबत येताना दिसतात. परंतु, त्यांचे व्याही शंकरराव गडाख यांची स्वतंत्र आघाडी आहे. त्यामुळे घुले गडाखांना मदत करतात की महायुतीतील लंघना, ते पहावे लागेल.
Web Summary : Local body elections see shifting alliances. BJP and NCP (Ajit Pawar) factions are preparing to contest independently in many areas due to local rivalries. Coalition unity faces challenges.
Web Summary : स्थानीय निकाय चुनावों में बदलते समीकरण। भाजपा और राकांपा (अजित पवार) गुट स्थानीय प्रतिद्वंद्विता के कारण कई क्षेत्रों में स्वतंत्र रूप से चुनाव लड़ने की तैयारी कर रहे हैं। गठबंधन एकता को चुनौती।