राज ठाकरे राळेगणसिद्धीत, अण्णा हजारेंसोबत बंद दाराआड 'राज' की बात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 11:55 IST2019-02-04T11:21:57+5:302019-02-04T11:55:35+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धी येथे दाखल झाले आहेत.  

Live : MNS Chief Raj Thackeray meets Anna Hazare at Ralgansiddhi | राज ठाकरे राळेगणसिद्धीत, अण्णा हजारेंसोबत बंद दाराआड 'राज' की बात

राज ठाकरे राळेगणसिद्धीत, अण्णा हजारेंसोबत बंद दाराआड 'राज' की बात

ठळक मुद्देअण्णा हजारेंच्या उपोषणाचा सहावा दिवसअण्णांनी उपोषण सोडावे, राज ठाकरेंची विनंतीअण्णांच्या आंदोलनाला राज ठाकरेंचा पाठिंबा

अहमदनगर - मनसे अध्यक्ष राज ठाकरे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धी येथे दाखल झाले आहेत. लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी आमरण उपोषण आंदोलन छेडले आहे. अण्णांच्या आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे. अण्णांची तब्येत उपोषणामुळे खालावली आहे. त्यांचं वजनही कमी झालं आहे.  या पार्श्वभूमीवर, राज ठाकरेंनी अण्णा हजारेंची भेट घेतली. या भेटीदरम्यान राज ठाकरेंनी अण्णांचं म्हणणं जाणून घेतले आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

अण्णा हजारे आंदोलनावर ठाम

दरम्यान, अण्णा हजारे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. 1971च्या कायद्याऐवजी लोकपाल कायद्यानुसार लोकायुक्त कायदा करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मान्य केले; मात्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारचा हा प्रस्ताव फेटाळून लावत आपले उपोषण सुरूच ठेवले. लोकपाल नियुक्तीचा प्रश्न सुटला नाही, तर समाजसेवेसाठी मिळालेला पद्मभूषण पुरस्कार परत करू, असा इशाराही त्यांनी दिला.

उपोषणाच्या पाचव्या दिवशी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने हजारे यांची रविवारी राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. अण्णांच्या मागण्यांबाबत राज्य व केंद्र सरकार गंभीर असल्याचे सांगत उपोषण मागे घेण्याची विनंती त्यांनी केली. पण लोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार हजारे यांनी व्यक्त केला. 
ते म्हणाले की, लोकपाल कायदा होऊन पाच वर्षे झाली तरीही गेल्या पाच वर्षांत लोकपाल नियुक्ती झाली नाही. सर्वोच्च न्यायालयाने तीनदा सरकारला फटकारले. २८ फेब्रुवारीला न्यायालयात सुनावणी असल्याचे सरकार सांगत आहे. मग २८ फेब्रुवारीपर्यंत उपोषण सुरू ठेवतो, असा टोला अण्णांनी लगावला.

निवडणुकीपूर्वी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली. वयोवृद्ध शेतक-यांना दरमहा ५ हजार रुपये निवृत्तिवेतन देण्याची आमची मागणी होती. पण, सरकारने वर्षाला सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेऊन शेतक-यांच्या दु:खावर मीठ चोळले आहे, अशी टीका अण्णांनी केली.

अण्णांच्या जीवाशी सरकार खेळतेय का?
लोकपाल कायदा होऊन गेल्या पाच वर्षांत लोकपालाची नेमणूक का झाली नाही? हजारे यांच्या जीविताशी केंद्र सरकार का खेळत आहे? गेल्या पाच दिवसांत साधी चौकशीही का केली नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारे यांच्या उपोषण आंदोलनासाठी शुभेच्छा का दिल्या?, दूध व शेतीमालाच्या भावाचे काय? अशा प्रश्नांचा भडीमार मंत्री गिरीश महाजन यांच्यावर राळेगणसिद्धी ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी केला.

यावर, हजारे यांच्या मागण्यांबाबत केंद्र व राज्य सरकार सकारात्मक व गंभीर असल्याचे सांगत सोमवारी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचे लेखी पत्र आणून हजारे यांचे उपोषण सोडवू. ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी हजारे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करावी, असे मंत्री महाजन म्हणाले.

(अण्णांनी सरकारचा प्रस्ताव फेटाळला; उपोषणावर ठाम, ‘पद्मभूषण’ परत करणार)



 

Web Title: Live : MNS Chief Raj Thackeray meets Anna Hazare at Ralgansiddhi