कोट्यवधींचे सीमोल्लंघन

By Admin | Updated: October 3, 2014 23:55 IST2014-10-03T23:55:34+5:302014-10-03T23:55:34+5:30

अहमदनगर : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा सणाच्या मुहूर्तावर शुक्रवारी नगरकरांची सोने, चांदी, कपडे, गृहोपयोगी वस्तू व वाहन खरेदीसाठी झुंबड उडाली़

Limitless Coins | कोट्यवधींचे सीमोल्लंघन

कोट्यवधींचे सीमोल्लंघन

अहमदनगर : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा सणाच्या मुहूर्तावर शुक्रवारी नगरकरांची सोने, चांदी, कपडे, गृहोपयोगी वस्तू व वाहन खरेदीसाठी झुंबड उडाली़ नगरमध्ये वाहन खरेदीतून सर्वाधिक ३० कोटी रुपयांची तर सोने-चांदी खरेदीतून सुमारे आठ कोटी रुपयांची उलाढाल झाली़ इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंचीही सुमारे एक कोटीच्या घरात खरेदी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले़
विजयादशमीच्या दिवशी सकाळी शस्त्र पूजन झाल्यानंतर घटउत्थापन करण्यात आले़ त्यानिमित्त केडगाव, बोल्हेगाव, दिल्ली गेट येथे शमीपूजन करण्यात आले़ तसेच विविध ठिकाणी सार्वजनिक स्तरावर शस्त्र पूजनाचे कार्यक्रमही झाले़ दुपारनंतर नगरकरांनी सोने, चांदी, गृहपयोगी वस्तू, वाहन खरेदीसाठी गर्दी केली़ अनेकांनी वाहनांची आगाऊ नोंदणी केली होती़ आगाऊ वाहन नोंदणी केलेल्या तसेच दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी आलेल्या नगरकरांना रात्री उशीरापर्यंत वाहनांचे वितरण करण्यात येत होते़ तथापि, महागडी वाहने आगाऊ नोंदणी करुनही न मिळाल्याने काहींना नाराजी पत्करावी लागली़ दुचाकी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होती़ वाहन खरेदीतून सुमारे ३० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले़
सोने, चांदीच्या खरेदीसाठी दुपारनंतर चांगली गर्दी झाली़ शुद्ध सोन्याला दिवसभरात मोठी मागणी राहिली़ तथापि, तयार दागिने खरेदी करण्याकडे गृहिणींचा कल दिसून आला़ अनेक ज्वेलर्सनी भेटवस्तुंची योजना सुरु केल्यामुळे सोन्या-चांदीची खरेदी तेजीत राहिली़ चांदीची भांडी आणि नाणे मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आले़ सोने-चांदी खरेदीतून दिवसभरात सुमारे ८ कोटींची उलाढाल झाली़ कापड खरेदीसाठी गेले दोन दिवस मोठी गर्दी झाली होती़ यातून लाखो रुपयांची उलाढाल झाली़ मात्र, दसऱ्याच्या मुहूर्तावर अपेक्षित खरेदी झाली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले़ तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या खरेदीसाठी नगरकरांनी मोठी गर्दी केली़ दिवसभरात एलईडी टीव्ही व फ्रिज खरेदी करण्याकडे चांगला कल राहिला़ यातून दिवसरात सुमारे १ कोटी रुपयांची उलाढाल झाली़ गृहखरेदीसाठीही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला़ गृहप्रकल्पांच्या साईटवर जाऊन अनेकांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर घराची नोंदणी केली़ यातून कोट्यवधींची उलाढाल झाल्याचे डेव्हलपर्सकडून सांगण्यात आले़ (प्रतिनिधी)

Web Title: Limitless Coins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.