शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये जाऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:25 IST2021-09-05T04:25:29+5:302021-09-05T04:25:29+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथील महावितरण कंपनीच्या विरोधात समन्वय समितीच्या वतीने माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली कंदील ...

शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये जाऊ
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथील महावितरण कंपनीच्या विरोधात समन्वय समितीच्या वतीने माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली कंदील आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास एकाही अधिकाऱ्याला कार्यालयात बसू देणार नाही. शेतकऱ्यांसाठी प्रसंगी जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, असा इशारा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिला.
कर्डिले म्हणाले, महावितरण कंपनीत सावळागोंधळ चालू असून शेतकऱ्यांना ट्रान्सफार्मर शंभर टक्के रक्कम भरल्याशिवाय मिळत नाही. महिलांनी गळ्यातील दागिने मोडून बिले भरली तरी एक-एक महिना ट्रान्सफार्मर मिळत नाही, ही शोकांतिका आहे. ग्रामीण भागात सर्व रोहित्र ओव्हरलोड झाल्याने ट्रान्सफार्मर जळत आहे. त्यामुळे ओव्हरलोड कमी करणे गरजेचे आहे. पाथर्डी, शेवगाव, नगर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. रस्ते, पूल बंधारे, पशुधन वाहून गेले. परंतु सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. मंत्री करोडो रुपये खर्च करून दौरा करत आहेत. परंतु प्रत्यक्षात मदत देत नाहीत, अशी टीका कर्डिले यांनी केली.
महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता किसन कोपनर यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारून मागण्या तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, जेऊरच्या सरपंच राजश्री मगर, बहिरवाडी सरपंच अंजना येवले, ससेवाडी सरपंच दत्तात्रय जरे, भाजपचे नगर तालुका उपाध्यक्ष राजेंद्र दारकुंडे, माजी सरपंच कैलास पटारे, संजय येवले, विकास कोथिंबिरे, सुनील पवार, गणेश आवारे, बाजार समिती संचालक बबनराव आव्हाड उपस्थित होते.
...........
माझ्या दौऱ्यामुळे मंत्र्यांना जाग
अतिवृष्टी झालेल्या परिसरात झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा मी सुरू केला अन् त्यानंतर मंत्र्यांना जाग आली. ते दौऱ्यावर आले. मात्र, त्यांनी नुकसानीची पाहणी करण्याचा फार्स केला असल्याचा आरोप माजी आमदार कर्डिले यांनी केला. पंचनाम्याची गरजच नाही. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट एकरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणीही कर्डिले यांनी केली.
.........
आंदोलनास प्रहारचा पाठिंबा
महावितरण कंपनीच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनास प्रहार संघटनेने पाठिंबा दिला आहे. प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, उपाध्यक्ष पप्पू येवले, संपर्कप्रमुख श्रीराम शिंदे तसेच बीडचे जिल्हाध्यक्ष दत्ताजी सानप यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेत शेतकऱ्यांच्या आंदोलनास प्रहार संघटनेचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले.