लोकमत न्यूज नेटवर्क
खर्डा : येथील ऐतिहासिक निंबाळकर गढी देखभालीअभावी सध्या शेवटच्या घटका मोजत आहे. या गढीची दुरुस्ती व मजबुतीकरण न झाल्यास, शहराच्या मध्यवस्तीतील ही इमारत दगड-मातीचे खिंडार होण्यास वेळ लागणार नाही. या गढीची दुरुस्ती व मजबुतीकरण करण्याची मागणी इतिहासप्रेमींकडून होत आहे.
१७९३ साली सुलतान राजे निंबाळकर यांनी ही गढी खर्डा गावाच्या मध्यभागी बांधली. निंबाळकर घराणे खर्डा सोडून गेल्यावरही गढी कित्येक वर्षे वापराविना पडून होती. तिची पडझडही मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यानंतर, रयत शिक्षण संस्थेने ही गढी, ताकभातेवाडा यांचा ताबा घेतला. या भव्य वस्तूला पुनश्च गतवैभव प्राप्त झाले. रयतची महाराष्ट्रातील सर्वात सुंदर शाळा म्हणून ही इमारत कित्येक वर्षे दिमाखात उभी होती. खर्डा व परिसरातील कित्येक पिढ्यांचे शालेय शिक्षण या गढीत झाले.
गावाच्या मध्यभागी साधारण ५० फूट उंचीच्या तटबंदी असलेल्या चबुतऱ्यावर पुन्हा दोन मजली भव्य बांधकाम असल्याने ही इमारत दुरूनच लक्ष वेधून घेते. इमारतीची तळापर्यंतची उंची साधारण १०० ते १२० फुटांपर्यंत आहे. ही इमारत पुन्हा मोठ्या दिमाखात उभी राहिली.
मराठवाड्यातील किल्लारी (जि.उस्मानाबाद) येथे झालेल्या १९९३ साली भूकंपाचा जोरदार तडाखा या इमारतीला बसला. विद्यार्थ्यांसाठी धोकादायक इमारत झाली, म्हणून शाळेचे नवीन बांधकाम झाले. शाळा खर्डा-जामखेड रस्त्यावरील जागेत स्थलांतरित झाली. गेल्या कित्येक वर्षापासून येथे एकही वर्ग भरत नसल्याने इमारतीची देखभाल बंद झाली. सध्या तिची प्रचंड पडझड झाली आहे. या गढीचा नजीकच्या निवासी घरांनाही धोका निर्माण झाला आहे. रयत शिक्षण संस्थेने ‘धोकेदायक इमारत’ असे फलक लावून आपली जबाबदारी झटकली आहे. विशेषतः पावसाळ्यात गढी लगतच्या रस्त्यावरून गावकरी जीव मुठीत घेऊन चालतात. या गढीवर आता जंगली झाडे, झुडपे, गवत, छोटे प्राणी, सरपटणारे प्राणी व साप अनेक वेगवेगळे पक्षी यांचे वास्तव्य आहे.
...
पुरातत्त्व विभागाकडून फक्त पाहणी
मध्यंतरी पुरातत्त्व विभागाने ही इमारत ताब्यात घेण्याबाबत पाहणी केली, परंतु प्रस्ताव लालफितीत अडकला की काय, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. यापूर्वीही निंबाळकर गढीचा येथील बारा प्रतिज्योतिर्लिंग मंदिरासह ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश झाला होता, परंतु ते कामही कोठे अडून बसले, असा प्रश्न इतिहासप्रेमींना पडला आहे.
....
ऐतिहासिक निंबाळकर गढीला गतवैभव प्राप्त व्हावे, अशी येथील ग्रामस्थांची इच्छा आहे. आमदार रोहित पवार यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. या गढीच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी सात कोटींची मागणी त्यांनी केली आहे. निधी प्राप्त झाला, तर या गढीला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल.
-विजयसिंह गोलेकर, अध्यक्ष, खर्डा परिसर तीर्थक्षेत्र, पर्यटन विकास कृती समिती.
....
फोटो-१७खर्डा गढी १-२
.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील ऐतिहासिक निंबाळकर गढीची मोठी पडझड झाली आहे. गढीच्या आजूबाजूला झाडेझुडुपे, गवत वाढलेले दिसत आहे.
....