शिंगणापूरला शंभर बेड्सचे कोविड सेंटर सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:22 IST2021-04-23T04:22:38+5:302021-04-23T04:22:38+5:30
नेवासा : शिंगणापूर येथे शंभर बेड्सचे कोविड सेंटर सुरू करणार असल्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी येथील आढावा बैठकीत सांगितले. ...

शिंगणापूरला शंभर बेड्सचे कोविड सेंटर सुरू करणार
नेवासा : शिंगणापूर येथे शंभर बेड्सचे कोविड सेंटर सुरू करणार असल्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी येथील आढावा बैठकीत सांगितले.
शिंगणापूर येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला गडाख यांनी भेट देऊन कोरोना रुग्णांशी संवाद साधला. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांना देण्यात येणाऱ्या जेवण व इतर सोयी-सुविधा, औषधोपचार आदींबाबत माहिती घेतली.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शिंगणापूर ग्रामीण रुग्णालयात प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार रूपेश सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, रुग्णालयातील डॉक्टर्स, देवस्थानचे पदाधिकारी व विश्वस्त यांच्यासमवेत बैठक घेऊन या ठिकाणी तत्काळ १०० बेड्सचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्याचे आदेश दिले. त्यात ४० ऑक्सिजन बेड्स, ८ आयसीयू बेड्सची सुविधा असणार आहे. शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली हे हॉस्पिटल सेवा देणार असून, त्यासाठी औषध पुरवठा करण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक पोखरणा यांना त्याचप्रमाणे ऑक्सिजन पुरवठ्याबाबत प्रांत व तहसीलदार यांना गडाख यांनी सूचना केल्या. तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकारी यांना सूचना देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असलेल्या ठिकाणी तत्काळ जाहिरात देऊन भरती करण्यास सांगितले.
तालुक्यातील आरोग्य यंत्रणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग वाढवून जास्तीत जास्त लसीकरण मोहीम राबवावी, अशाही सूचना त्यांनी केल्या. शासनस्तरावरून जास्तीत जास्त ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. लवकरच ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा दूर होऊन पुरवठा सुरळीत होईल, असे गडाखही यांनी सांगितले.