खरीप हंगाम धोक्यात
By Admin | Updated: July 17, 2014 00:30 IST2014-07-16T23:22:24+5:302014-07-17T00:30:46+5:30
शेवगाव : तालुक्यात लागोपाठ दुसऱ्या वषीर्ही पावसाने ओढ दिल्याने पिण्याचे पाणी व चाऱ्याच्या संकटाने उग्र स्वरुप धारण केले आहे.
खरीप हंगाम धोक्यात
शेवगाव : तालुक्यात लागोपाठ दुसऱ्या वषीर्ही पावसाने ओढ दिल्याने पिण्याचे पाणी व चाऱ्याच्या संकटाने उग्र स्वरुप धारण केले आहे. तहानलेल्या गावांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. पेरण्याच न झाल्याने संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात आला आहे.
पावसाळ्याची पहिली तीनही नक्षत्रे कोरडी गेली आहेत. तालुक्यातील २५ गावे व ९७ वाड्या,वस्त्यांना पावसाळ्यातही २५ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. तालुक्याची जीवनरेखा ठरलेल्या जायकवाडी जलाशयात जेमतेम तीन टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्याने या पाण्यावर अवलंबून असलेल्या तालुक्यातील शेवगाव-पाथर्डी व ५४ गावे, शहरटाकळी व २८ गावे, बोधेगाव, बालमटाकळीसह ८ गावे तसेच हातगाव व २५ गावांच्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचे भवितव्य धोक्यात आले आहे.
शासनाने जाहीर केलेल्या टंचाईग्रस्त तालुक्यांच्या यादीत शेवगाव तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शेवगाव तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत झालेल्या पावसाचे प्रमाण ६७ ते ६८ टक्के कमी असताना तालुक्याचा टंचाईग्रस्त तालुक्याच्या यादीत समावेश व्हावा यासाठी पालकमंत्री मधुकर पिचड यांचे लक्ष वेधल्याची माहिती आमदार चंद्रशेखर घुले यांनी टंचाई आढावा बैठकीत दिली. (प्रतिनिधी)
नियोजनाविषयी सूचना
दुष्काळाचे संकट लक्षात घेऊन पाणीपुरवठा विभागाने आपत्कालीन आराखडा तयार करावा, तहानलेल्या गावांचे टँकरचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत, जनावरांच्या छावण्या तसेच शेतकऱ्यांना दावणीला चारा उपलब्ध होईल या पद्धतीने तातडीने नियोजन हाती घेण्याच्या सूचना तालुका प्रशासनास देण्यात आल्या आहेत.
अर्थकारण ठप्प !
रोज पावसाळी वातावरण तयार होते. मात्र, त्यानंतर जोराचे वारे वाहून ढग पांगतात. तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने शेतीसह सर्वच क्षेत्रांचे अर्थकारण ठप्प झाले आहे. बाजारपेठेतही उलाढाल नसल्याने शुकशुकाट आहे.