केलवडला लसीकरण खोलीची वाणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 13:51 IST2019-07-07T13:50:28+5:302019-07-07T13:51:08+5:30
राहाता तालुक्यातील केलवड गावाच्या स्थापनेपासूनच लसीकरणाच्या खोलीची गावात वाणवा आहे.

केलवडला लसीकरण खोलीची वाणवा
नितीन गमे
अस्तगाव/राहाता : राहाता तालुक्यातील केलवड गावाच्या स्थापनेपासूनच लसीकरणाच्या खोलीची गावात वाणवा आहे. सध्या ज्या खोलीत लसीकरणाचे काम होते, त्या खोलीचे छत कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे गरोदर महिला व लहान बालकांचा जीव धोक्यात आला आहे.
ग्रामसभेत अनेक वेळा विषय घेऊन देखील काम होत नाही. गावची लोकसंख्या मोठी आहे. जवळपास ९० लहान बालके व १०० गरोदर महिला गावात असल्याने महिण्यातून दोन वेळा लसीकरण होते,. गावात खोली नसल्याने आरोग्य सेविकांना गावात कुठेतरी जागा शोधून लसीकरण करावे लागते. आजवर दलित वस्तीच्या पारावर, मराठी शाळा, जनावरांचा दवाखाना, गळक्या घरात तर सध्या धोकादायक जुन्या तलाठी कार्यालयात लसिकरणाचे काम होत आहे.
वारंवार तक्रार करुनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे गावात लसीकरणाची खोली बांधावी, अशी मागणी सविता सोनवणे, स्वाती गमे, अनिता गायकवाड, वंदना बढे, नीता रजपूत, कविता वैद्य, मनिषा पारखे, योगिता राऊत, जया घोरपडे, उज्ज्वला गमे आदी महिलांसह ग्रामस्थांनी केली आहे.
केलवड गावात आम्हाला एका फिक्स ठिकाणी लसीकरणासाठी खोली द्या. प्रत्येक वेळी लसीकरणाची जागा बदलते. त्यामुळे ठिकाण लवकर सापडत नाही. आपण आरोग्याच्या रक्षणासाठी लसिकरण करतो. परंतू या ठिकाणी आमचा जीव धोक्यात जात आहे. मागणी करुनही याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष केले जात आहे. -प्रणिता कोताडे, केलवड.
केलवड गावातील जुने तलाठी कार्यालय लसीकरण खोलीसाठी दुरुस्त करण्याचा निर्णय झाला आहे. चौदावा वित्त आयोगातील २०१८-१९ चा ५० टक्के निधी आला नाही. निधी आल्यानंतर काम सुरू केले जाईल. -एस.एस सांगळ, ग्रामसेवक, केलवड. ता. राहाता.