जेऊर गाव कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:21 IST2021-07-27T04:21:50+5:302021-07-27T04:21:50+5:30

केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथे संतुकनाथ बाबांच्या मठातील आरती व पूजा करण्यास मज्जाव करण्यात आल्याने गावातील वातावरण चांगलेच ...

Jeur village is strictly closed | जेऊर गाव कडकडीत बंद

जेऊर गाव कडकडीत बंद

केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथे संतुकनाथ बाबांच्या मठातील आरती व पूजा करण्यास मज्जाव करण्यात आल्याने गावातील वातावरण चांगलेच चिघळले. निषेध म्हणून ग्रामस्थांकडून स्वयंस्फूर्तीने सोमवारी गाव बंद ठेवण्यात आले.

जेऊर येथे संतुकनाथ बाबांची संजीवन समाधी आहे. येथे राज्य तसेच परराज्यातून भक्त भाविक मोठ्या संख्येने येत असतात. बाबांच्या संजीवन समाधीची पूजा व आरती २५ वर्षांपासून संतुकनाथ सेवा मंडळाच्या सदस्यांकडून करण्यात येत आहे. संतुकनाथ सेवा मंडळ गावामध्ये विविध सामाजिक, धार्मिक उपक्रम राबविले जातात. रक्तदान शिबिर, कोरोना काळात किराणा वाटप, गावामध्ये दिंडीचे आयोजन, निवृत्त माजी सैनिकांचा सन्मान समारंभ असे विविध उपक्रम संतुकनाथ सेवा मंडळाकडून राबविण्यात आलेले आहेत. या सेवा मंडळाचे सदस्य आरती व पूजा करतात.

मात्र रविवारी (दि.२५) रफिक शेख व प्रदीप पवार यांनी मठामध्ये आरती व पूजा करण्यास मज्जाव केल्याने वातावरण चांगलेच चिघळले. ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने सोमवारी (दि.२६) गाव बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदविला. जेऊर येथील संतुकनाथ बाबांच्या संजीवन समाधीची जमीन व इतर अधिकार श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान (सोनारी, जि. उस्मानाबाद) यांचा आहे. या प्रकरणी सोनारी येथील मठाधिपती पिर योगी शामनाथजी महाराज यांनी खुलासा केला आहे. त्यामध्ये समाधीस्थळी सर्व जाती धर्माचे लोक दर्शनासाठी येऊ शकतात. तसेच रफिक शेख व पुजारी प्रदीप पवार यांनी मठातील सेवेबाबत हस्तक्षेप करू नये असे म्हटले आहे. सोशल मीडियावर चुकीचे संदेश पाठवू नये व गावात शांतता राखावी. महंत स्वतः जेऊर येथे येऊन यावर मार्ग काढणार आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

जेऊर येथील संतुकनाथ सेवा मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. संतुकनाथ बाबांच्या आरतीला व पूजेला मज्जाव करण्यात आला. या घटनेचा ग्रामस्थांकडून निषेध नोंदविण्यात आला आहे.

----जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन

जेऊर परिसरातील धार्मिक स्थळी सुरू असलेले अवैध धंदे तत्काळ बंद करून कारवाई करण्याबाबतचे निवेदन जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून जिल्हा पोलीस प्रमुखांना देण्यात येणार आहे.

260721\img-20210726-wa0161.jpg

जेऊर फोटो

Web Title: Jeur village is strictly closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.