ओढ्यांच्या खोलीकरणासाठी जेसीबी देणार
By Admin | Updated: May 8, 2016 00:51 IST2016-05-08T00:26:43+5:302016-05-08T00:51:12+5:30
अहमदनगर : राज्यातील नद्या-ओढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, अतिक्रमणही वाढले आहे़

ओढ्यांच्या खोलीकरणासाठी जेसीबी देणार
अहमदनगर : राज्यातील नद्या-ओढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, अतिक्रमणही वाढले आहे़ नदी व ओढ्यांच्या खोलीकरणासाठी प्रत्येक जिल्ह्याला १५ जेसीबी यंत्र देण्याचे राज्य सरकारचे धोरण असल्याचे सांगत या कामात लोकसहभाग वाढवा, असे आवाहन राज्याचे गृह (शहरी विभाग) व सामान्य प्रशासन राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले़
पाटील यांनी शनिवारी नगर तालुक्यातील वाळकी येथील जनावरांची छावणी तसेच सारोळा कासार येथील बांधबंदिस्ती व नदी खोलीकरणाच्या कामाला भेट देऊन दुष्काळस्थितीची पाहणी केली. सारोळा कासार येथे अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन दुष्काळ निवारण्यासाठी उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
यावेळी खा. दिलीप गांधी, प्रा.भानुदास बेरड, हरिभाऊ कर्डिले, बाळासाहेब हराळ आदी उपस्थित होते. यावेळी मंत्र्यांनी छावणीत फेरफटका मारून शेतकऱ्यांशी संवाद साधला. चारा, पाणी वेळेवर मिळतो का, याबाबत शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.
यावेळी दिलीप भालसिंग व हरिभाऊ कर्डिले यांनी तालुक्यातील छावण्यांची माहिती त्यांना सादर केली. छावणीसाठी चारा उपलब्ध होत नसल्याची तक्रार भालसिंग यांनी मंत्र्यांसमोर मांडली.
नगर बाजार समितीच्यावतीने तालुक्यात सध्या ६ छावण्या सुरु असून आणखी दोन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. यावेळी उमेश कासार, डॉ.अजित फुंदे, रेवण चोभे, युवराज पोटे, बाळासाहेब पोटघन आदी उपस्थित होते. यानंतर डॉ. पाटील यांनी सारोळा कासार येथील बांधबंधिस्तीच्या कामाला भेट दिली. तसेच गावात लोकवर्गणीतून सुरु असलेल्या खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामास त्यांनी भेट दिली.
सरपंच रवींद्र कडूस यांनी गावाने ५१ लाख लोकवर्गणी जमा करण्याचे ध्येय समोर ठेवले असून आतापर्यंत २३ लाख जमा झाले, हे काम पूर्ण झाले तर गावात ४० कोटी लीटर पाणीसाठा वाढणार असल्याचे सांगितले. राज्यमंत्र्यांनी याबाबत गावाचे कौतुक केले़
त्यानंतर त्यांनी प्रांत, तहसीलदार, गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी यांची बैठक घेवून दुष्काळग्रस्त भागातील कामांचा आढावा घेतला.
(तालुका प्रतिनिधी)