कावीळ झालेल्या महिलेवर फादरने पाणी शिंपडत लावलं तेल; योग्य उपचार न घेतल्याने महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 00:04 IST2025-07-12T23:55:00+5:302025-07-13T00:04:01+5:30

अहिल्यानगरमध्ये उपचारांअभावी एका महिलेचा काविळीमुळे दुर्दैवी मृत्यू झाला.

Jaundice prone woman dies Case registered against father in Kopargaon under Prevention of Witchcraft Act | कावीळ झालेल्या महिलेवर फादरने पाणी शिंपडत लावलं तेल; योग्य उपचार न घेतल्याने महिलेचा मृत्यू

कावीळ झालेल्या महिलेवर फादरने पाणी शिंपडत लावलं तेल; योग्य उपचार न घेतल्याने महिलेचा मृत्यू

Ahilyanagar Crime : कावीळ झालेल्या महिलेला औषधोपचार न घेण्याचा सल्ला देऊन मंत्र म्हणत पाणी अंगावर शिंपडले. तेल कपाळावर लावण्यास दिले. असे प्रकार करत राहिल्याने काही दिवसांतच महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये घडला. महिलेच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या फादर चंद्रशेखर गौडा याच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री बारा वाजता जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय जीवन पंढरे हे कोपरगाव शहरातील खडकी परिसरात राहतात. त्यांच्या घराजवळच बहीण वनिता विश्वनाथ हरकळ राहतात. १ जुलै रोजी वनिता आजारी पडल्या. त्यांना संजय पंढरे यांचा पुतण्या विवेक पंढरे हा डॉक्टरांकडे घेऊन गेला. त्यानंतर पुन्हा ३ जुलै रोजी डॉक्टरांनी तपासण्या केल्यानंतर कावीळ झाल्याचे सांगितले. काही जणांनी आयुर्वेदिक औषधी घेण्याचा सल्ला दिला होता.

संजय पंढरे हा सायंकाळी औषधी घेऊन घरी आला तेव्हा समतानगर चर्चमधील फादर चंद्रशेखर गौडा हे वनिता यांच्या शेजारी बसलेले होते. ते म्हणाले, यांना कुठलाही आजार नाही. कोणतेही औषध घेऊ नका. त्यांना बाहेरची बाधा झाली आहे. यावेळी फादरने त्यांच्याकडे असलेल्या तेलाच्या बाटलीवर हात ठेवून मंत्र म्हटले. हे तेल कपाळावर लावायला सांगितले. बाटलीतील पाणी हातावर घेऊन मंत्र म्हणत ते पाणी वनिता यांच्या अंगावर शिंपडले. तसेच दिवसातून तीन-चार वेळेस बाटलीतील पाणी पिण्याचा सल्ला दिला. दरम्यान ४ जुलै रोजी वनिता यांची प्रकृती खालावली. त्याच दिवशी वनिता यांना लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तेथे दाखल करून घेतले. औषधोपचार सुरू असताना ९ जुलै रोजी वनिता हरकळ यांचा मृत्यू झाला.

यानंतर वनिता यांच्या मृत्यूस फादर चंद्रशेखर गौडा हे कारणीभूत असल्याची फिर्याद संजय पंढरे यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी चंद्रशेखर गौडा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१) सह महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३चे कलम ३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Jaundice prone woman dies Case registered against father in Kopargaon under Prevention of Witchcraft Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.