जामखेड : कडधान्याचा असणारा तुटवडा व तुरीच्या डाळीची मागणी यामुळे तालुका कृषी खात्याने यावर्षी खरीप हंगामात ‘एक तालुका एक वाण’ ही संकल्पना राबवून बीडीएन ७११ या वाणाची १५ हजार हेक्टर क्षेत्रात लागवड करण्याचे धोरण राबविले आहे. खर्चिक व मेहनती असलेल्या बाजरी व कपाशीला फाटा देऊन शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवून देणाऱ्या तुरीचे आगार म्हणून तालुक्याची ओळख निर्माण करण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे.
केंद्र सरकारने कडधान्याला प्राधान्य दिले आहे. मागील वर्षी कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण घेतले होते. कडधान्य पिकाचे महत्त्व व तुरीच्या पिकामधून आर्थिक उत्पादन कसे अधिक भेटू शकते, याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक गावात चावडीवर जाऊन राजेंद्र पवार यांनी मार्गदर्शन केले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत ११ हजार २०० हेक्टर क्षेत्रात पेरा झाला होता.
तूर लागवड सोपी असून कमी मेहनत व यांत्रिकद्वारे काढता येत असल्याने तसेच आधारभूत किंमत साडेपाच हजार क्विंटल आहे. मागणी जास्त असल्यामुळे तुरीचा दर ८ हजार क्विंटलपर्यंत गेला होता. यामुळे नगदी पीक म्हणून तुरीकडे पाहता येईल. मागील तीन वर्षांचा तूर पेरा पाहिला तर आलेख वाढत आहे. २०१८-१९ साली ७ हजार ३०० हेक्टर क्षेत्रात लागवड झाली होती. २०१९-२० मध्ये ८ हजार ७०० व २०२०- २१ मध्ये ११ हजार २०० हेक्टर क्षेत्रात पेरा झाला.
२०२१-२२ साठी १५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्याचा मानस तालुका कृषी खात्याचा आहे.
मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे बीडीएन ७११ हा पांढऱ्या तुरीचा वाण विकसित केला आहे. ती प्रक्रिया येथे अंगीकारली जात आहे. बीजप्रक्रिया करताना ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा व २५ ग्रॅम रायझेबियम प्रति किलो बियाण्यास लावावे. यामुळे १० ते १५ टक्के उत्पादनात वाढ होते. यानंतर ५ बाय २ फुटांवर लागवड करावी. तुरीचे पीक ४५ दिवसांचे झाल्यानंतर शेंडा खुडावा व तूर फुलोऱ्यात आल्यानंतर लिंबोळी अर्काची फवारणी करावी. त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करावी बीडीएन ७११ हा पांढरा वाण उत्पादन देण्यास इतर वाणापेक्षा सरस ठरला आहे. पाणी, खते व किडीचे व्यवस्थापन केल्यास एकरी १० ते १५ क्विंटल उत्पादन मिळते.
---
बीडीएन ७११ या पांढऱ्या वाणाची तूर मागील वर्षी पेरली होती. हा वाण काढणीला लवकर येतो. तुरीला भरपूर शेंगा येतात. संपूर्ण तूर एकाच वेळी परिपक्व होते. ११५ ते १२० दिवसांत पीक काढण्यास येते. यंत्राद्वारे झटपट काढता येते. एकरी १२ क्विंटल उतारा पडला होता. यावर्षी २० एकर क्षेत्रावर लागवड करणार आहे.
-नानासाहेब ढवळे,
हळगाव, तूर उत्पादक
---
सध्या कडधान्याचा असणारा तुटवडा व डाळीची मागणी पाहता शेतकऱ्यांनी बीडीएन ७११ या पांढऱ्या विकसित वाणाची लागवड करावी. कमी खर्चात व मनुष्यबळाअभावी उत्पादन घेता येते व आधारभूत किमतीपेक्षा जास्त दर मिळून शेतकरी आपली आर्थिक उन्नती करू शकतो. तालुक्यातील १५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात एक तालुका एक वाण ही संकल्पना राबविणार आहे.
--सुधीर शिंदे,
तालुका कृषी अधिकारी