कौशल्य विकासच्या आॅनलाईन प्रशिक्षणास संस्थांचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 15:42 IST2020-05-29T15:40:36+5:302020-05-29T15:42:16+5:30
लॉकडाऊनमुळे परराज्यातील कुशल कामगार गावी निघून गेले आहेत. उद्योजकांकडून कुशल कामगारांची मागणी होत आहे़. मात्र शहरी व ग्रामीण तरुण-तरुणींना रोजगाराची संधी निर्माण करून देणा-या कौशल्य विकास प्रशिक्षण व्यवसाय प्रशिक्षणाला कोरोनाचा फटका बसला आहे़.

कौशल्य विकासच्या आॅनलाईन प्रशिक्षणास संस्थांचा नकार
अहमदनगर : लॉकडाऊनमुळे परराज्यातील कुशल कामगार गावी निघून गेले आहेत. उद्योजकांकडून कुशल कामगारांची मागणी होत आहे़. मात्र शहरी व ग्रामीण तरुण-तरुणींना रोजगाराची संधी निर्माण करून देणा-या कौशल्य विकास प्रशिक्षण व्यवसाय प्रशिक्षणाला कोरोनाचा फटका बसला आहे़.
कौशल्य विकास, व्यवसाय प्रशिक्षण आयटी,संगणक टाईपराईटर, अशा विविध संस्थांच्या माध्यमातून तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे़. या संस्थांच्या माध्यमातून प्लंबर, फिटर, मेकॅनिक ते अगदी आरोग्य, बांधकाम, वस्त्रोउद्योग, कृषी, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणांना प्रशिक्षण दिले जाते.
नगर जिल्ह्यात प्रशिक्षण देणा-या २१३ नोंदणीकृत संस्था आहेत. मार्च ते मे या तीन महिन्यात जास्तीत जास्त तरूण प्रशिक्षणाचा लाभ घेत असतात. गेल्या मार्च महिन्यांत १७७ बॅचेस नगर जिल्ह्यातील विविध संस्थांमार्फत सुरू होत्या. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला़ त्यामुळे हे प्रशिक्षण ठप्प झाले आहे.
सरकारने आॅनलाईन प्रशिक्षण देण्याबाबत कळविले आहे़. परंतु, आॅनलाईन प्रशिक्षण देणे शक्य नाही, असे संस्थांकडून कळविण्यात आले आहे. त्यात प्रशिक्षणार्थींची बायोमेट्रिक हजेरी घेणे संस्थांना बंधनकारक आहे. त्यानुसारच त्यांना सरकारकडून अनुदान देण्यात येते़ पण, सध्या कोरोनामुळे बायोमेट्रिक हजेरी बंद असल्याने प्रशिक्षण देण्यास अडथळा येत असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले़.
जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. एप्रिलअखेर १ लाख ५५ हजार ७७१ नोेंदणीकृत बेरोजगार आहेत. लॉकडाऊनमुळे परराज्यातील कामगार निघून गेले आहेत. त्यांच्या जागी स्थानिकांना संधी देण्याचा शासनाचा आदेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगारांना संधी मिळणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.