साईनगरीला गुरूपौर्णिमा उत्सवाचे वेध
By Admin | Updated: July 7, 2016 23:23 IST2016-07-07T23:16:08+5:302016-07-07T23:23:02+5:30
शिर्डी : साईबाबा संस्थानच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी १८ ते २० जुलै २०१६ या काळात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत असून या दृष्टीने विविध कामांनी वेग घेतला आहे़

साईनगरीला गुरूपौर्णिमा उत्सवाचे वेध
शिर्डी : साईबाबा संस्थानच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी १८ ते २० जुलै २०१६ या काळात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत असून या दृष्टीने विविध कामांनी वेग घेतला आहे़ या उत्सवात सर्व साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी केले आहे.
गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून सोमवारी (१८ जुलै ) पहाटे ४़३० वाजता श्रींची काकड आरती, ५ वा. श्रींच्या फोटोची व पोथीच्या मिरवणुकीने उत्सवाचा श्रीगणेशा होईल़याच बरोबर द्वारकामाईत साई सच्चरित्राचे अखंड पारायण सुरू होईल़रात्री श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात येईल़या दिवशी पारायणासाठी द्वारकामाईत रात्रभर सुविधा राहील.
मंगळवारी पहाटेही काकड आरतीनंतर अखंड पारायण समाप्ती व श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक काढण्यात येईल़ रात्री श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे. हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार असून मंदिरा शेजारील स्टेजवर रात्रभर कलाकारांची हजेरी होईल़ उत्सवाच्या सांगता दिवशी बुधवार रोजी गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार असून साडेदहा वाजता गोपालकाला कीर्तन व दहीहंडी कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होईल़
उत्सवानिमित्त द्वारकामाई मंदिरात प्रथम दिवशी होणाऱ्या साईसच्चरिताच्या अखंड पारायणासाठी जे साईभक्त इच्छुक आहेत त्यांनी आपली नावे दि. १७ जुलै रोजी दुपारी १ ते साडेपाच या वेळेत समाधी मंदिरासमोरील व्यासपीठावर नोंदवावीत. सोडत पद्धतीने पारायणासाठी भक्तांची नावे सायंकाळी साडेपाच वाजता निश्चित करण्यात येतील. उत्सव काळात तीन दिवस श्री साई सत्यव्रत (सत्यनारायण), अभिषेक पूजा व वाहनांची पूजा बंद राहणार असून श्रींना अर्पण केलेली पवित्र वस्त्रे, वस्तू वगैरेंची जाहीर लिलावाने प्रसादरुपाने विक्री करण्यात येणार आहे. याबरोबरच उत्सवाचे तीनही दिवस रात्री ८ ते १०़३० समाधी मंदिराशेजारील उत्तरेकडील स्टेजवर निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम होतील, असेही शिंदे यांनी सांगितले.
उत्सवासाठी संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत द. कुलकर्णी व संस्थान त्रिसदस्यीय समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे, उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप आहेर, सर्व प्रशासकीय अधिकारी,सर्व विभागप्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.
(तालुका प्रतिनिधी)