इंडिया आघाडीने एकत्रित रणनिती आखावी; भाकपची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 18:34 IST2024-01-22T18:34:18+5:302024-01-22T18:34:45+5:30
भाजपचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची भक्कम एकजूट दिसायला हवी.

इंडिया आघाडीने एकत्रित रणनिती आखावी; भाकपची मागणी
अहमदनगर : भाजपचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची भक्कम एकजूट दिसायला हवी. तसेच राज्यात इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी एकत्रित रणनिती आखणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांना बैठकीसाठी बोलवण्यात यावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे.
याबाबत पटोले यांची मुंबईत पक्षाचे राज्य सचिव कॉ. ॲड सुभाष लांडे, राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. प्रकाश रेड्डी, मुंबई सेक्रेटरी कॉ. मिलिंद रानडे व राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ अशोक सुर्यवंशी यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी कॉग्रेसचे नेते हुसेन दलवाई उपस्थित होते. भाजपचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष या आघाडीतील महत्वाचा घटक पक्ष आहे.
लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची एकत्रित बैठक होणे आवश्यक आहे, राज्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षाशिवाय इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षही कार्यरत आहेत. भाजपचा पराभव करण्यासाठी आघाडीतील इतर सर्व पक्षांशी विचारविनिमय होणे आवश्यक असल्याचे याप्रसंगी ॲड. लांडे यांनी सांगितले. यावर पटोले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत २५ जानेवारी रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात येईल असे सांगितले.